आता भारतातील तरूणच नव्हे तर मुलंही जास्त खुश दिसत नाहीत. कोरोनानंतर (Corona) मुलांच्या मानसिक आरोग्यावर बराच प्रभाव पडला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीबाबत (Students Mental Health) एक सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे 50 टक्के मुलं त्यांचे खासगी आयुष्य तसेच बॉडी इमेज यांच्याबद्दल खुश नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर सुमारे 51 टक्के विद्यार्थ्यांना शाळेकडून शिकवले जाणारे ऑनलाइन विषय आणि पाठ्यपुस्तकातील साहित्य समजणे अवघड जाते, अशी माहिती या सर्वेक्षणातून (Survey) मिळाली आहे. देशभरातील 3.78 लाख विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवत त्यांची मतं जाहीर केली होती. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊया, की आपली मुलं किती खुश आहेत?
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 3.78 लाख विद्यार्थ्यांपैकी 1.88 लाख मुली तर 1.90 लाख मुलं होती आणि 11 जण थर्ड जेंडरचे विद्यार्थी होते. 6वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली आहे की, अंदाजे अर्धे विद्यार्थी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खुश नाहीत. मात्र यातील एक चांगली गोष्ट अशी की, शाळेत जाणारे 73 टक्के विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाबद्दल संतुष्ट आहेत. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) हे सर्वेक्षण केले. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 3.78 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची कामगिरी व त्यांचे वर्तन यांच्या आधारे हे सर्वेक्षण केले आहे.
एनसीईआरटीच्या या मानसिक स्वास्थ्याच्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे की 6वी ते 12वी मधील 73 टक्के विद्यार्थी त्यांची शाळा व शिक्षणाबद्दल समाधानी आहेत. तर 33 टक्के विद्यार्थ्यांची स्थिती चिंतेची आहे. या सर्वेक्षणानुसार शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 33 टक्के विद्यार्थ्यांवर शालेय वातावरणाचे दडपण असते. मुख्य म्हणजे कोरोनाचा सर्व विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर थोड्याफार प्रमाणात तरी परिणाम झाला आहे, अशी माहिती एनसीईआरटीच्या या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
शाळेत जाणाऱ्या 29 टक्के विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव दिसून आला. तर 43 टक्के विद्यार्थ्यांमध्ये मूड स्विंग्ज दिसून आले. या सर्वेक्षणानुसार, 51 टक्के विद्यार्थ्यांना शाळेकडून शिकवले जाणारे ऑनलाइन विषय आणि पाठ्यपुस्तकातील साहित्य समजणे अवघड जात असल्याचे समोर आले. तसेच 28 टक्के विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यास घाबरतात. 14 टक्के मुलं जास्त भावनिक (इमोशनल) आहेत, अशी माहितीही या सर्वेक्षणातून मिळाली.