विद्यापीठाच्या निवडणुका आता ‘या’ दिवशी होणार; विद्यापीठाची मागणी मान्य

| Updated on: Sep 21, 2024 | 6:45 PM

मुंबई विद्यापीठाला मुंबई हायकोर्टाकडून चांगलाच दणका मिळाला आहे. अखेर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई हायकोर्टाने या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश दिले होते. पण विद्यापीठाने केलेल्या विनंतीनुसार आता या निवडणुका येत्या मंगळवारी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

विद्यापीठाच्या निवडणुका आता या दिवशी होणार; विद्यापीठाची मागणी मान्य
mumbai university
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका विद्यापीठाने अचानक रद्द केल्या होत्या. त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर विद्यापीठाने उद्याच निवडणुका घेण्याचे आदेश विद्यापीठाला दिले होते. पण विद्यापीठाने या निवडणुका उद्या घेणं शक्य नसल्याचं आणि एवढ्या कमीवेळात तयारी होणार नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच या निवडणुका मंगळवारी घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली. कोर्टाने विद्यापीठाची ही विनंती मान्य केली असून आता मंगळवारी सिनेटच्या निवडणुका होणार आहेत.

उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर एवढ्या अपुऱ्या वेळेत निवडणूक घेणे शक्य नसल्याचं विद्यापीठने मत व्यक्त केलं. न्यायमूर्ती आशिष चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये विद्यापीठाने आपलं मत मांडलं आणि मंगळवारी निवडणुका घेण्यास परवानगी देण्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. विद्यापीठाचं म्हणणं मुंबई हायकोर्टाने मान्य केलं असून आता मंगळवारी निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवार 24 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत. तर 27 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

13 हजार पदवीधरांचा विजय

दरम्यान, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल विद्यापीठाने सिनेट निवडणूक रद्द केली होती. या संदर्भात आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. आम्ही कोर्टाचे आभार मानतो. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून 13 हजार 500 पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्र रचलं होतं ते न्यायालयाने हाणून पाडलं आहे. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. त्यासोबतच आम्ही युवासेना निवडणुकीसाठी सज्ज आहोत. या निवडणुकीत आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकून दाखवूच, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

आम्ही जिंकून दाखवू

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावर दुपारी भाष्य केलं होतं. आमच्या सिनेट निवडणुकीतील उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. कारण त्यांचा विजय निश्चित आहे. विद्यापीठाच्या निवडणुका रद्द करणारं हे सरकार आहे. इतकं घाबरट आणि डरपोक सरकार कधी पाहिलं नव्हतं. 2015 ची निवडणूक 2018 ला घेतली होती. तेव्हा युवासेना म्हणून आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो होतो. ती निवडणूक तीनवेळा रद्द करण्यात आली होती. तरीही आम्ही जिंकलो होतो. या निवडणुकीतही आम्ही जिंकून दाखवू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.