ठाणे : बदलापूरच्या आश्रमशाळेत राहणाऱ्या शबाना शेख (Shabana Shaikh) या विद्यार्थिनीनं एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळवलाय. तिच्या या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी तिचा सत्कार केला. शबानाच्या या यशाबद्दल सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.शबाना शेख ही विद्यार्थिनी बदलापूरच्या बॉम्बे टीन चॅलेंज या संस्थेच्या आश्रमशाळेत राहते. शबाना चार वर्षांची असताना ती या संस्थेच्या स्वयंसेवकांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये सापडली होती. तेव्हापासून ती याच आश्रमशाळेत वास्तव्याला आहे. या आश्रमशाळेत राहून तिनं बदलापूरच्या आयईएस कात्रप विद्यालयातून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. तर पुढे अंबरनाथच्या साऊथ इंडियन कॉलेजमधून तिनं विज्ञान शाखेतून 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ‘नीट’ ही प्रवेशपरीक्षा देऊन तिनं जिद्दीनं एमबीबीएसला प्रवेश मिळवला.
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शबानाला प्रवेश मिळालाय. यासाठी ठाणे जिल्हा महिला बालकल्याण विभागानं तिला अनाथ असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तिच्या या यशानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तिचा विशेष सत्कार केला. तसंच पुढे काहीही मदत लागली, तर हक्काने सांग, आम्ही मदत करू, असं म्हणत शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असं ध्येय ठेवण्याचा संदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शबानाला दिला. यानंतर शबानानं सर्वांचे आभार मानलेत.
सुरुवातीपासून डॉक्टर व्हायचं ठरवलं असल्यानं त्यादृष्टीनं तयारी केली होती. मात्र, क्लासेसमध्ये केलेल्या तयारीमुळं समाधान न झाल्यानं एक वर्ष ब्रेक घेऊन तयारी केली. स्वत: अभ्यास करुन नीटची परीक्षा दिली आणि यश मिळालं, असं शबाना शेख हिनं सांगितलं. तिनं महिला व बालकल्याण विभागाचे देखील आभार मानलेत.
शबाना ज्या बॉम्बे टीन चॅलेंज संस्थेच्या आश्रमशाळेत राहून शिकली, त्या संस्थेनं शबानाला मोठं होऊन काय व्हायचंय, या दृष्टीने आधीपासूनच तयारी केली होती. आता तिच्या इच्छेनुसार एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतरही तिच्या शिक्षणाची सर्व प्रकारची आर्थिक तरतूद या संस्थेनं करून ठेवलीये. त्यामुळं शबानाला कोणतंही टेन्शन न घेता अभ्यास पूर्ण करता येणार असल्याचं बॉम्बे टीन चॅलेंज आश्रमशाळेच्या अधीक्षिका पद्मजा गुडे यांनी सांगितलंय. बॉम्बे टीन चॅलेंज या संस्थेच्या आश्रमशाळेत शबाना राहतेय, त्या संस्थेत आज 6 ते 18 वयोगटातल्या 25 मुली वास्तव्याला आहेत. त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम ही संस्था करतेय. त्यामुळं शबानाचा आदर्श घेऊन या संस्थेतून अशा अनेक शबाना घडतील, आणि पुढे जाऊन समाजाची सेवा करतील, यात शंका नाही.
शिवसेना आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र समितीकडून अवैध; नेमकं प्रकरण काय?
आधी बदली, आता थेट निलंबन, बिग बींचा एक्स-बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित