अधिकाऱ्यांची बदली झाली पण ‘पॅटर्न’ नाही सोडला; लातूर पॅटर्नची नाशिकमध्ये होतेय जोरदार चर्चा, कारण काय?

| Updated on: Feb 08, 2023 | 2:21 PM

नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये अचानक लातूर पॅटर्नची चर्चा होऊ लागली आहे. त्यानिमित्ताने शासनाच्या शालेय पोषण आहार ह्या योजनेची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे.

अधिकाऱ्यांची बदली झाली पण पॅटर्न नाही सोडला; लातूर पॅटर्नची नाशिकमध्ये होतेय जोरदार चर्चा, कारण काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : शासन सेवेत ( Maharashtra Goverment ) मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली होत असते. त्यानिमित्ताने या शहरातून त्या शहरात जाणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त असते. त्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या ( Zp Officer ) कामाचे ठिकाण बदलतं. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये नाशिकच्या ( Nashik News ) जिल्हा परिषदेत प्राथमिक विभागात भगवान फुलारी या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यापूर्वी ते लातूर येथे होते. प्राथमिक शिक्षण विभागात भगवान फुलारी यांनी लातूरमध्ये जे काम केलं तेच काम इथंही सुरू केलंय. मात्र, पूर्वीच्या अधिकाऱ्यांपेक्षा फुलारी यांनी केलेलं काम अधिक चर्चेत आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये फुलारी यांच्या लातूर पॅटर्नची ( Latur Patern ) चर्चा होऊ लागली आहे.

डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भगवान फुलारी या अधिकाऱ्यांची बदली झालीय. पदभार स्वीकारताच त्यांनी लातूर पॅटर्नची अंमलबजावणी नाशिकमध्येही सुरू केली आहे.

खरंतर भगवान फुलारी हे काही नवं काम करत नाही. शासनाची असलेल्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे अंमलात आणत आहे. 1995 पासूनची शालेय पोषण आहाराची योजना या निमित्ताने चर्चेत आली आहे.

भगवान फुलारी यांनी नाशिकमध्ये पदभार स्वीकारताच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्राथमिक शाळांना सूचना दिल्या होत्या, त्यामध्ये पदभार स्वीकारल्यानंतर फुलारी यांनी दुसऱ्या आठवड्यातच अंमलबजावणी सुरू केली होती.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराच्याबाबतीत सूचना दिल्या आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत काटेकोरपने आठवड्यातील दोन दिवस फळे वाटप होत आहे.

पोषण आहारात जो निधी येतो त्यापैकी जो निधी अतिरिक्त आहारासाठी असतो त्यामध्ये प्रत्येक मुलाला ऋतुमानानुसार फळ वाटप होत आहे. अचानक झालेला हा बदल पाहून अनेक शाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वीही योजना होती मात्र अंमलबजावणीचा अभाव असावा त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, अचानक शाळेत फळं वाटप होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना हा बदल शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे.

फुलारी यांनी सध्याच्या वातावरणानुसार केळी वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहे. शासनाच्या उद्दिष्टे जी आहेत त्यात फुलारी यांचा लातूर पटर्न यशस्वी होत आहे.

शिक्षणाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, शाळेत विद्यार्थ्यांनी येऊन शिक्षण घ्यावे, शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी शासनाची शालेय पोषण आहार योजना आहे.