मुंबई : सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय बोर्डाचा दहावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे मागील महिन्यापासून सुरू झालेली अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे. ऑनलाइन निकाल जाहीर होण्याआधीच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पार्ट-1 भरला आहे. मात्र केंद्रीय बोर्हांचा निकालच जाहीर नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी नोंदणीदेखील अद्याप सुरू झालेली नाही. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत अकरावी प्रवेशात सहभागी होणाऱ्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेतून वगळता येणार नाही. सर्वच बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार अकरावीत प्रवेश द्यायचा झाल्यास केंद्रीय बोर्डाचे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसे केल्यास ज्युनियर कॉलेज सुरू होण्यास सप्टेंबरअखेर उजाडणार आहे.
कोरोनामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा दोन सत्रांत झाल्या. 26 एप्रिलपासून दुसऱ्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या. सुमारे महिनाभर या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थी निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. या मंडळाला प्रथम आणि द्वितीय सत्रातील परीक्षेचे गुण एकत्र करून निकाल तयार करायचा आहे. आयसीएसई बोर्डाचा निकाल जुलैमध्ये जाहीर होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे या केंद्रीय बोडींचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेशाचे नेमके चित्र स्पष्ट होणार नाही. प्रवेशप्रक्रिया सुरू व्हायला उशीर झाल्यास अकरावीचे वर्ग सुरू होण्यासही विलंब होणार आहे. दरवर्षी 75 टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर शिक्षण विभाग कॉलेजना वर्ग सुरू करण्यास देते.
मुंबई विभागाचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यंदा 1 लाख 6 हजार विद्यार्थी 75 टक्क्यांच्या पुढे तर 10, 764 विद्यार्थ्यांना 90 टक्केहून अधिक गुण आहेत. केंद्रीय बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर या •बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांची यात भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईतील नामवंत कॉलेजांत प्रवेश मिळविण्याचे टेन्शन विद्यार्थ्यांमध्ये कायम आहे.
मुंबई विभागात ऑनलाइन प्रवेशात किती जागा आहेत याची माहिती अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही. महाविद्यालयांकडून जागांची नोंदणी केली जात आहे. त्यामुळे नेमक्या किती जागा असणार याबाबत माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेली नाही. गेल्या वर्षी 3 लाख 21 हजार जागा होत्या. त्यातील सुमारे 80 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांचा पुन्हा ऑनलाइन प्रवेशात समावेश आला आहे
दरवर्षी मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एसएससी आणि बिगर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. बहुसंख्य कॉलेजमधील जागा या पहिल्या दोन गुणवत्ता यादीतच फुल्ल होतात. काही मोठ्या कॉलेजमध्ये विनाअनुदानित जागेसाठीही चुरस पाहायला मिळत आहेत. अकरावीचा प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थी गेल्या वर्षीची कटऑफ पाहून कॉलेज पसंतीक्रम ठरवत असतात. यात सीबीएसई आणि आयसीएसईच्या निकालाचा टक्कादेखील पाहायला मिळतो. मात्र यंदा सर्वच मंडळाचे निकालचा न झाल्याने कटऑफ काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.