पुणे : केंद्र सरकारकडून देशभरात करण्यात येणाऱ्या संपादणूक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडण्यात आलेल्या शाळा उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सुरु ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू ठेवण्याचे शालेय शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत 12 नोव्हेंबर रोजी करण्यात येणाऱ्या संपादणूक सर्वेक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहता कामा नये यावर एकमत झाले. तसेच सर्वेक्षणासाठी निवडलेल्या तिसरी,पाचवी, आठवी आणि दहावीच्या शाळा 12 नोव्हेंबर रोजी सुरू ठेवण्यात याव्यात असे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे सध्या राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे बहुतांश भागात एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वाहतुकीची सोय करण्यात यावी, असे निर्देशदेखील वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (NAS) प्रत्येक जिल्हयात काही निवडक शासकीय, खासगी अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, विज्ञान, परीसर अभ्यास, समाजशास्त्र या विषयात दोन तासांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी वरील इयत्तांमधील विद्यार्थी व शिक्षकांना 12 नोव्हेंबर रोजी चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील शाळेत येण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना लोकलचा प्रवास करावा लागणार आहे त्यांना 12 नोव्हेंबर रोजी लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इतर बातम्या :
आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, गोळ्या झाडून काटा काढला, हादरवून टाकणारा खून
(Varsha Gaikwad and state education department ordered to keep schools open for NAS survey)