येत्या आठ ते दहा दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच हा बॉम्ब टाकला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात उद्धव ठाकरे गटाला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संजय निरुपम येत्या दोन दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहितीही संजय शिरसाट यांनी दिली.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. संजय निरुपम यांचा प्रवेश उद्या परवापर्यंत झाला होईल. निरुपम यांच्या काही मागण्या आहेत का वगैरे याबाबतची त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. त्यानंतर ते प्रवेश करतील. पण ते शिवसेनेत येतील की भाजपात येतील हे दोनद दिवसात कळेल, असं सांगतानाच ठाकरे गटाच्या आमदारांचा दोनचार दिवसात शिवसेनेत प्रवेश होणार आहे. येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिटिंग बोलावली होती. त्यात सखोल चर्चा झाली. या पूर्वी ज्यांना तिकीट दिलं नाही, त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाणार आहे. एक दोन दिवसात सर्व आमदारांची बैठक बोलावली जाणार आहे. त्याच दिवशी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. लोकसभा आणि विधानसभेला जे मागच्यावेळी दुसऱ्या क्रमांकवर पडले अशा उमेदवारांना एकत्र बोलावलं जाणार आहे. त्यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. शिवसेना प्रमुख असताना राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर यायचे. त्यावेळी आमची भेट व्हायची. तेव्हापासून आमची मैत्री आहे. आमचं नातं कायम आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट होती. या भेटीत राजकीय चर्चा झाली. पण मी कुणाचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनातील खदखद ते मेळाव्यात मांडणार. राजकारणाची दिशा ते जाहीर करणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.
शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. खडसे आल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्यट केलं. कुणाच्या अडचणी वाढवण्यासाठी खडसे येत नाहीत. आपला पक्ष आपला आहे, याची जाणीव झाल्याने ते घरवापसी करत आहे. ते आले तर भाजपचा फायदाच होणार आहे, असं ते म्हणाल्या.