निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपकडून लोकसभेच्या जागा हिरावून घेतल्या जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिंदे गटाच्या अनेक खासदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबतची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अमरावती घेतली. आता नाशिकही बळकावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शिंदे गटाकडून होत असतानाच शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी एक नवा दावा केला आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या सहा जागा मागितल्या जात असल्याचा दावाच अर्जुन खोतकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागा सोडणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
अर्जुन खोतकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. यावेळी खोतकर यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करतानाच भाजपवर जोरदार टीका केली आहे. आमच्या जागांबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याचे परिणाम खोलवर जनतेपर्यंत होताना दिसत आहेत. भाजपला जसा 20 जागा जाहीर करण्याचा अधिकार आहे. तसाच आमच्या 18 जागा जाहीर करण्याचा आम्हालाही अधिकार आहे. परभणी, संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव आणि वाशिम आमचं आहे. मात्र या या जागा मागत असाल तर हे न्यायसंगत नाही, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.
नाशिकच्या जागेवर देखील आमचा उमेदवार आहे. नाशिकमध्ये आमचा खासदार आहे. तिथे आमच्या खासदाराने शक्तिप्रदर्शन केलं. मात्र, या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार किंवा भाजपचा उमेदवार पुढे केला जातोय. हे अजिबात योग्य नाही. आमच्या जागा आम्हाला मिळायलाच हव्यात, असं खोतकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तोंडावर चांगलं बोलायचं आणि माघारी वाईट बोलायचं हे चांगलं नाही. दानवेंबाबत माझ्या मनात काहीही नाही. ते लोकसभेला उभे आहेत. त्यांच्यासाठी मी काम करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या आधी शिंदे गटातील नेत्यांनी भाजपवर मोठा आरोप केला होता. निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली आमच्या जागा भाजप घेऊ पाहत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला होता. आमच्या जागा बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तर रिपोर्ट हा वास्तववादी नसतो. तो सँपल रिपोर्ट असतो. मतदारसंघातील जनभावना काय आहेत? आपल्याला काय वाटते? याचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. माझ्या मतदारसंघाचा रिपोर्टही निगेटिव्ह देण्यात आला होता. पण मी नेहमीपेक्षा किती तरी पटीने अधिक मते घेऊन जिंकून आलो. अशावेळी या सर्व्हे रिपोर्टचं काय करायचं? असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता.