उपमुख्यमंत्री बाबा हरले पण मार बसला हकीमला, त्या निकालाची राज्यात होतेय एकच चर्चा

| Updated on: Dec 07, 2023 | 10:34 PM

टीएस बाबा निवडणुकीत हरतील यावर कोणाचाही विश्वास नव्हता. त्यामुळे या निकालाने केवळ काँग्रेस समर्थकांनाच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही धक्का बसला. टीएस बाबा यांच्या या पराभवात 'हकीम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अब्दुल मजीद यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

उपमुख्यमंत्री बाबा हरले पण मार बसला हकीमला, त्या निकालाची राज्यात होतेय एकच चर्चा
chhattisgarh vidhan sabha election
Follow us on

रायपूर | 7 डिसेंबर 2023 : छत्तीसगडमध्ये निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर आता दिल्लीपासून रायपूरपर्यंत बैठकांचा जोर वाढला आहे. तर, काँग्रेस पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्या पराभवाचा धसका कॉंग्रेसने घेतला आहे. टीएस सिंहदेव उर्फ टीएस बाबा यांचा अवघ्या 94 मतांनी पराभव झाला. हा धक्का सहन न झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हकीम अब्दुल मजीद याला चांगलाच चोप दिलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचे आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल सरकारमधील अनेक मंत्री पराभूत झाले. यात पक्षाचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव (टीएस बाबा) यांचाही समावेश आहे. टीएस सिंहदेव यांचा भाजप नेते राजेश अग्रवाल यांनी अंबिकापूर विधानसभा मतदारसंघातून अवघ्या 94 मतांनी पराभव केला.

टीएस बाबा निवडणुकीत हरतील यावर कोणाचाही विश्वास नव्हता. त्यामुळे या निकालाने केवळ काँग्रेस समर्थकांनाच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही धक्का बसला. टीएस बाबा यांच्या या पराभवात ‘हकीम’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अब्दुल मजीद यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. निकालानंतर टीएस बाबांचे समर्थक इतके संतप्त झाले की त्यांनी आपला राग हकीम अब्दुल मजीद यांच्यावर काढत त्यांना बेदम मारहाण केली.

‘हकीम’च्या खेळामुळे बाबांचे गणित बिघडले

अब्दुल मजीद हे एकेकाळी काँग्रेस आणि टीएस सिंहदेव यांचे समर्थक मानले जात होते. मात्र, निवडणुकीपूर्वी हकीम अब्दुल मजीद यांनी जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) पक्षात प्रवेश केला. हकीम यांना अंबिकापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. दुसरीकडे टीएस सिंगदेव (बाबा) यांच्या कॅम्पने अब्दुल मजीद यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अब्दुल मजीद यांनी निवडणूक लढविली. त्यांना 1193 मते मिळवली. हीच मते टीएस सिंगदेव यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

अवघ्या 94 मतांनी पराभव

टीएस सिंघदेव (बाबा) हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजेश अग्रवाल यांच्याकडून अवघ्या 94 मतांनी पराभूत झाले. अब्दुल मजीद यांची 1193 मते त्यांच्या पराभवात अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण त्यांना मिळालेली मते कुठेतरी टीएस बाबा यांच्या बाजूने गेली असती. हकीम यांना मुस्लिम समाजाचीच मते मिळाल्याचे मानले जाते. हे मतदार काँग्रेसचे पारंपरिक मतदार होते, असे मानले जाते. त्यामुळे अब्दुल मजीद मैदानात उतरले मतांमध्ये फूट पडली आणि टीएस बाबांचा खेळ बिघडला असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

हकीम अब्दुल मजीद यांच्यावर संताप

भाजप उमेदवार राजेश अग्रवाल यांना आपल्या विजयाचा विश्वास नव्हता असे बोलले जात आहे. कारण मतमोजणी सुरू होती, तसतसे टीएस बाबा सतत आघाडीवर होते. फरक वेळोवेळी वाढत आणि कमी होत होता. याच दरम्यान हकीम अब्दुल मजीद तेथे पोहोचले. भाजप उमेदवाराला ते गमतीने म्हणाले, काळजी करण्याची गरज नाही, माझ्याकडे बाबांचे औषध आहे. यानंतर अंतिम मतमोजणीत टीएस बाबा पराभूत झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याचा पराभव झाल्याचे समजताच अब्दुल मजीद त्यांच्या संतापाचा बळी ठरला. हकीम यांना काँग्रेस समर्थकांनी मारहाण केली. नंतर पोलिसांनी कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणली.