पणजी : गोव्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं 2022च्या विधानसभा निवडणुकांना (Goa Assembly Election Result LIVE 2022) सामोरी गेली, त्या डॉ. प्रमोद सावंतांच्याच गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार की नाही, याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय घेईल, असं डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी विश्वजीत राणे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसनं खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस नेत्याच्या फोटो विश्वजीत राणेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवर झळकला होता. त्यानंतर विश्वजीत राणे हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी महत्त्वाकांक्षा बाळगून असल्याची कुजबूज सुरु झाली होती. आता एकूणच निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पुन्हा डॉ. प्रमोद सावंत होणार की नाही, यावरुनही तर्क वितर्कांना उधाण आलंय.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटलंय की, गोव्यात भाजपचंच पुन्हा सरकार येईल. गोव्यातील लोकांनी बाहेरच्या लोकांना नाकारलं आहे, असं म्हणत विश्वजीत राणे यांनी टीएमसी आणि आप पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. तर दुसरीकडे घोटाळे करणाऱ्यांनाही नाकारलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. गोव्याच्या लोकांसाठी राबणाऱ्या पक्षाच्या बाजूनं लोकांनी मतदान केलं असल्याचं विधान विश्वजीत राणे यांनी केलं आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचं नेतृत्त्व डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देण्यात आलं होतं. गेल्या अडीच वर्षात आपल्या कामगिरीमुळे डॉ. प्रमोद सावंत हे एक तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री म्हणून देशभर ओळखले जात होते. आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी सावध उत्तर देत मुख्यमंत्रीपदी कोण असेल, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं म्हटलं होतं.
निवडूक निकालाच्या दोन दिवस आधीच प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत सावंत यांनी मोदींना माहिती दिली असल्याचं सांगितलं जात होतं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतरही अनेकदा या दोन नेत्यांमधील चढाओढ कुणापासूनही लपून राहिली नव्हती. या दोन्हीही नेत्यांनी आपले एकमेकांसोबत चांगले संबंध असल्याचं मान्य जरी केलं असलं, तरी राजकीय वर्तुळात याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.
अशातच आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत राणे हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. विश्वजीत राणे हे गोव्याचे ज्येष्ठ राजकारणी प्रतापसिंह राणे यांचे सुपुत्र आहेत. सत्तरीतील पर्ये आणि वाळपई या दोन मतदारसंघात राणे पिता-पुत्रांनी निर्विवाद सत्ता राहिली आहे. अशातच आता गोव्याच्या निकालानंतर राजकीय चढाओढ भाजपमध्ये पाहायला मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?