पणजी : गोवा अजिब है, असं म्हणतात. हीच गोष्ट गोव्याच्या राजकारणाबाबतही म्हटली तर वावगं ठरु नये! दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला (Son of Manohar Parrikar) भाजपनं उमेदवारी दिली नाही, अशी चर्चा सुरुवातील रंगली. वाद रंगल्यानंतर उत्पल यांना पणजी वगळून दुसरीकडून उमेदवारी देण्याच्या ऑफर आल्या. पण पणजीतून लढण्यावर उत्पल ठाम होते. पणजीबाबत (Panaji) आग्रही असलेल्या उत्पल यांना डावलण्यामागे भाजपची नेमकी काय स्ट्रॅटर्जी आहे? असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहेच. पणजीत भाजपनं ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्याच्याबाबतच अनेक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. पणजीत उत्पल यांना डावून ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांनी तर एकेकाळी पणजी पोलिस स्थानकावर हल्लाही केला होता. व्हॅलेंटाईन डेला (Valentine’s Day) गोव्यात मतदान पार पडले. त्याआधी गोव्याची राजधानी असलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाचे भाजपच्या उमेदवाराबाबत जाणून घेणार आहोत. उत्पल यांच्याऐवजी ज्यांना भाजपनं पणजीतून उमेदवारी दिली, त्यांचं नाव आहे, बाबुश मॉन्सेरात.
पणजीतून भाजपनं बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवार दिली आहे. या बाबुश मॉन्सेरात यांचा राजकीय प्रवास हा फारच रंजक आहे. काँग्रेसमधून बाबुश यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून यूगो पक्षात प्रवेश केला होता. यूगो पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढली आणि जिंकली देखील होती. तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची किमया बाबुश यांनी करुन दाखवली आहे. ताळगाव, पणजी आणि सांताक्रूझ या मतदारसंघातून बाबुश यांनी विधानसभा निवडणूक जिंकून दाखवलेली आहे. त्यामुळे पणजी आणि आजूबाजूच्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता किती प्रचंड आहे, याची कल्पना करता येऊ शकेल. अशावेळी इतक्या तगड्या उमेदावाराला डावलून उत्पल यांना पणजीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता फारच कमी असणार, असं मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त होतं. जे कालांतरानं खरंही झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलं.
पणजीतून उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर उत्पल यांनी भाजपला सुनावलं होतं. गुन्हेगारी पात्रता असलेल्यांना तिकीट दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या टीकेमागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, याचीही चर्चा रंगली आहे.
2008 साली झालेल्या पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्यानंतर पणजीचे बाबुश मॉन्सेरात चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, बलात्कारासारख्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे. इतकंच काय तर ताळगाव आयटी हबविरोधात त्यांनी तीव्र आंदोलनही केलं होतं.
पणजी मतदारसंघ येतो गोव्यातील तिसवाडी या तालुक्यात. तिसवाडी तालुक्यात बाबुश मॉन्सेरात यांचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं म्हटलं जातं. बाबुश यांनी पत्नीदेखील गोव्याच्या प्रमोद सावंत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून त्यांनी महसूल खातं देण्यात आलं होतं. तर दुसरीकडे गेल्याच वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीनंतर बाबुश यांचा मुलगा रोहित पणजी महापालिकेचा महापौर झाला.
जुलै 2017 मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या बाबुश मॉन्सेरात यांनी आपली राजकीय भूमिका आक्रमक आणि रोखठोक अशीच ठेवली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी आपल्याच सरकारमधील आरोग्यमंत्री असलेल्या विश्वजीत राणेंना खुलं आव्हान दिलं होतं. सनसनाटी आरोप करत बाबुश मॉन्सेरात यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, 2017 साली झालेल्या राजकीय भूकंपात काँग्रेसचे 10 आमदार फोडण्यात आले होते. त्यातही बाबुश यांची भूमिका महत्त्वाची होती, असंही बोललं जातं.
एकूणच आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं, तर पणजीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या आणि आपली तगडी ताकद असलेल्या उमेदवाराला डावलून भाजपला उत्पल यांना उमेदवारी देणं परवडणारं नव्हतं, अशीही कुजबूज ऐकायला मिळते. मात्र या सगळ्यात उत्पल यांनी उपस्थित केलेला उमेदवारांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मुद्दाही अनुत्तरीच राहतो, हेही विशेष!
गोवा विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या 301 पैकी 80 उमेदवारांवर गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 29 जणांवर आरोप निश्चित झालेत. तर दोघांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार, विनयभंग, महिला अत्याचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, भ्रष्टाचार, चोरी, धमकी देणे, पोलीस स्थानकावर हल्ला, मारहाण, फसवणूक व गुन्हेगारी कारस्थान, रस्ता रोखणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जुगार, रेल्वे वाहतूक अडवणे, दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे, आंदोलन करणे, धनादेश न वटणे, कोविड नियमांचे उल्लंघन अशा अनेक गुन्ह्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन खटले सुरू झाले आहेत किंवा विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत, अशी माहिती 80 उमेदवारांनी आपापल्या प्रतिज्ञापत्रातून सादर केली आहे.
कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले
Anna Hazare: तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार
Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना ‘पुष्पा’ने लावले वेड; म्हणतात…!