कोल्हापूर : गोव्याची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आमचेच सरकार येणार असा दाव करत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनीदेखील नव्या वर्षाच्या सुरुवातीला अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. अंबाबाईच्या दर्शनसाठी त्यांनी थेट कोल्हापूर गाठले असून यावेळीदेखील गोव्यात भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
नव्या वर्षाच्या मुहूर्तावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापुरात सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. गोव्याची निवडणूक जिंकण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रचाराचा शुभारंभ देवीचे दर्शन घेऊन केला आहे. तसेच त्यांनी जनतेला नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे व आरोग्यदायी जावो असे म्हणत सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गोव्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून मागील अनेक दिवसांपासून तयारी केली जातेय. आजपचा पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेससोबतच यावेळी या निवडणुकीत आम आदमी पार्टी तसेच तृणमूल काँग्रेसने उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला येथे तिहेरी आव्हान असणार आहे. हेच आव्हान समोर ठेवून भाजप कामाला लागली असून जोमाने प्रचार केला जात आहे.
गोव्यात आम आदमी पार्टी निवडणूक लढवत आहे. येथे ठिकठिकाणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याच पोस्टर्सवर प्रमोद सावंत यांनी आक्षेप घेतला होता.या पोस्टर्सबाबत नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने 27 डिसेंबर 2021 रोजी सांगितले होते. त्यामुळे येथे नवा वाद पेटला होता.
काँग्रेस स्वबळावर लढणार
दरम्यान, भाजपचा पारंपरिक विरोधक अर्थात काँग्रेस गोव्याची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. डिसेंबर महिन्यात संजय राऊत राहुल गांधींना भेटले होते. तेव्हा गोव्यावर चर्चा झाली होती. पण काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नसल्याचं दिसून येत आहे.
इतर बातम्या :