बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 123 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर भाजपकडे अवघ्या 70 जागा आहेत. तर जेडीएसला 26 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने बेंगळुरूमधील 5 स्टार हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक केल्या आहेत. विजयी आमदारांना रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. उद्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काँग्रेसने भाजपला सत्तेतून हुसकावून लावले आहे. पक्षाला प्रचंड यश मिळाल्यानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. बेळगाव, धारवाड आणि हुबळीत काँग्रेसने हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत. या ठिकाणाहून आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. तसेच उद्या 12 वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार बनवण्यासंबंधी चर्चा होणार आहे.
बंगळुरूपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या समर्थकांचा जल्लोष पहायला मिळत असून बंगळुरूमधील पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक आनंद साजरा करत आहेत. तसेच दिल्लीतील मुख्यालयातही आनंदोत्सव साजरा होत आहे. दुसरीकडे, काँग्रसचे अनेक बडे नेते हे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या घरी मिठाईचं वाटप केलं जात आहे.