मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतायत. काँग्रेस बाजी मारणार हे स्पष्ट आहे. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. विद्यमान सत्ताधारी भाजपाच पराभव करुन काँग्रेस सत्तेत येणार हे स्पष्ट आहे. फक्त काँग्रेस किती जागांवर विजय मिळणार? त्याची उत्सुक्ता आहे. भाजपाचा या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होणार अशी स्थिती आहे.
दरम्यान कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्लेषण केलय. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे कोणते मुद्दे महाराष्ट्राला लागू पडतात, ते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
‘पापातून कर्नाटकात सरकार स्थापन झालेलं’
“लोकसभेच्या एकवर्ष आधी मोठं सत्ता परिवर्तन झालय. कर्नाटक आणि महाराष्ट्रात घोडाबाजार करुन सरकार खाली पाडण्यात आलं. पैशांचा गैरवापर झाला. चौकशी संस्थांचा वापर करण्यात आला, काही लोकांना आमिष दाखवली गेली. या पापातून कर्नाटकात सरकार स्थापन झालं. तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘अशा गोष्टींचा पुरावा नसतो, चर्चा असते’
“सरकार स्थानपनेसाठी कर्नाटकात जे व्यवहार झाले, खर्च केला गेला, किंवा आर्थिक व्यवहार झाले होते. कर्नाटकात आमच्या पक्षाने त्याचं दरपत्रक जाहीर केलं होतं. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच हजार कोटी असा त्यात उल्लेख होता. अशा गोष्टींचा पुरावा नसतो, चर्चा असते” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
’40 टक्के कमीशन असा प्रचार’
“असं जेव्हा घडतं, तेव्हा वसुली सुरु होते, तिथे वसुली सरकार चालू झालेलं. कर्नाटकात कुठलीही काम करताना कॉन्ट्रॅक्टरकडून 40 टक्के कमीशन मागितल जायचं. एका हिंदुत्ववादी संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवाने स्वत: यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून तक्रार केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे 40 टक्के कमीशन असा प्रचार सुरु झाला” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
‘महाराष्ट्रालाही हेच लागू होतं’
“त्यामुळे लोकांच्या मनावर हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे बिंबवण्यात आलं. सरकार स्थापनेच्यावेळी जे व्यवहार झाले, त्याची वसुली सुरु आहे, हे ठसवण्यात आलं. महाराष्ट्रालाही हेच लागू होतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आम्ही या निवडणुकीत स्थानिक विषय घेतले. बरोजगारी, भाववाढ हे मुद्दे घेतले. जाहीरनाम्यातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.