मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला चांगलंच डिवचलं आहे. कर्नाटकातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पूर्णपणे झिडकारून लावलं आहे. हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. त्यांनी पराभव स्वीकारावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, असा संजय राऊत म्हणाले. राज्या राज्यातून भाजपच्या टोळ्या कर्नाटकात खोके घेऊन आल्या होत्या. पण कर्नाटकातील जनता भाजपच्या दबावाला बळी पडली नाही. आता पराभव झाला तरी तोडफोड करून काही करता येते का ते भाजप पाहत आहे, असा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. हा मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पराभव समोर आल्याने त्यांनी बजरंबलीला निवडणुकीत आणले. पण बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली, असा हल्लाच त्यांनी चढवला.
महाराष्ट्रातून काही लोक कर्नाटकात प्रचाराला गेले होते. राज्यातून मोठी टोळी गेली होती. पण त्यांनी जिथे प्रचार केला तिथे भाजपचा पराभव झाला. भाजपचा प्रत्येक ठिकाणी दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आम्ही प्रयत्न केले. आमची कमिटमेंट आहे. त्यामुळे आम्ही प्रचाराला जातो. हार-जीत आम्ही पाहत नाही. या जागा पडाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पैशाचा महापूर ओतला होता. आपल्याच लोकांची गद्दारी करण्यासाठी त्यांनी हे केलं, असा आरोपगही त्यांनी केला.