मुंबई : केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. केरळ विधानसभेतील (Kerala Assembly Election Results 2021) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव आमदाराने आपली जागा राखण्यात यश मिळवलं आहे. इलाथूर मतदारसंघातून (Elathur) ए के शशीधरन (A. K. Saseendran) यांची विजयी घोडदौड सुरु आहे. (Kerala Assembly Election Results 2021 NCP Candidate A K Saseendran winning)
अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर
केरळातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि वाहतूक मंत्री ए के शशीधरन पुन्हा एकदा इलाथूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले. गेल्या वेळी त्यांनी 29 हजार 57 इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी, सुरुवातीच्या कलांमध्ये (दुपारी साडेतीन वाजेपर्यंत) त्यांना 9672 मतांनी आघाडी मिळाली आहे. त्यांना जवळपास 21 हजार 464 म्हणजेच 50 टक्के मतं मिळाली. अपक्ष उमेदवार सुल्फीकार मयुरी इलाथूरमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजप उमेदवार टी पी जयाचंद्रन मास्टर हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. (संदर्भ – निवडणूक आयोग वेबसाईट)
शशीधरन केरळचे वाहतूक मंत्री
75 वर्षीय ए के शशीधरन यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या मंत्रिमंडळात वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. माकप नेते पिनरयी विजयन यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या डाव्या लोकशाही आघाडीत (Left Democratic Front – LDF) राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी आहे. एकमेव आमदार असूनही राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. आता एलडीएफ पुन्हा केरळच्या सत्तेत येण्यास सज्ज आहे. त्यामुळे शशीधरन यांना पुन्हा मंत्रिपद मिळतं का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Congratulations to our senior leader Shri P. C. Chacko for playing a crucial role in NCP’s success in Kerala assembly polls. I am sure that he will continue to contribute towards strengthening NCP in the state in future.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
शशीधरन यांची कारकीर्द
शशीधरन यांनी याआधी 1980, 1982, 2006, 2011 आणि 2016 अशी पाचवेळा आमदारकी भूषवली आहे. आता त्यांची सलग चौथी, तर एकूण सहावी आमदारकीची टर्म असेल. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते. तर राष्ट्रवादी प्रवेशानंतर 1999 ते 2003 या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे महासचिवपद आणि उपाध्यक्षपद, तर 2003 ते 2006 या काळात केरळ राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद भूषवले आहे.
लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर राजीनामा
लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर 26 मार्च 2017 रोजी शशीधरन यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले. मात्र 2018 मध्ये निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते पुन्हा मंत्रिपदी आले. (Kerala Election NCP Candidate Saseendran)
पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरुन केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांचं अभिनंदन केलं आहे. “केरळ निवडणुकांमध्ये ऐतिहासिक सलग विजयासाठी अभिनंदन. आपण या निवडणुका एकत्र लढलो आणि आता कोव्हिडविरुद्धची लढाईही एकत्र लढू” असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
Congratulations to Mr. @vijayanpinarayi on a historical consecutive victory in the Kerala elections.
Together we fought these elections and now together we will fight the battle against Covid!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
संबंधित बातम्या :
केरळमध्ये डावे, तामिळनाडूमध्ये द्रमुक, आसाम, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता
शेवटच्या तीन टप्प्यात भाजपसोबत ‘खेला’?; कोरोनामुळे मतदारांचा ममतादीदींना कौल?
(Kerala Assembly Election Results 2021 NCP Candidate A K Saseendran winning)