पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा अखेर निकाल लागला. यात भाजपच्या समाधान आवताडे यांनी बाजी मारली आणि आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पराभव सहन करावा लागला. राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष भाजप दोघांनीही जोरदार ताकद लावली होती. अशात कोण जिंकणार याचे अनेक अंदाज लावण्यात आले आणि अनेक एक्झिट पोलही जाहीर झाले. मात्र, त्यात पुण्यातील ‘द स्ट्रेलेमा’ (The Strelema Pune) संस्थेचा अंदाज अचूक ठरलाय. त्यामुळे संपूर्ण राज्यात या एक्झिट पोलची आणि त्याच्या अचूकतेची चर्चा सुरु आहे (Know all about how The Strelema Exit Poll proved exactly correct in Pandharpur Bypoll).
द स्ट्रेलेमा संस्थेने निवडणुकीदरम्यान केलेल्या अचूक सर्वेक्षणावरुन मतदानाच्या दिवशी आपला एक्झिट पोल जाहीर केला होता. त्यात भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946 इतक्या मतांचा अंदाज वर्तवला होता. म्हणजेच भाजपच्या आवताडे यांना 3438 मतांनी विजय मिळेल असं भाकित वर्तवण्यात आलं. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशीही आवताडे यांना याच दरम्यान मतं मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या भालके यांना 3733 मतांनी पराभव केला. यानंतर आता द स्ट्रेलेमा संस्थेने इतका अचूक अंदाज कसा वर्तवला असा प्रश्न विचारला जात आहे.
अचूक एक्झिट पोलमागील कारणं
द स्ट्रेलेमा या संस्थेने निवडणुका जाहीर झाल्यानंतर 21 मार्च ते 3 एप्रिल या काळात आपल्या 10 जणांच्या पथकासह थेट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ गाढला. येथे त्यांनी जमिनीवर जाऊन अनेक समाज घटकांशी जाऊन चर्चा केली आणि जनतेचा कल समजून घेतला. त्यासाठी त्यांनी सामान्य नागरिकांपासून, राजकारणाची समज असलेले, पत्रकार, स्थानिक राजकीय नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा सर्वांशीच चर्चा केली. या भागात शास्त्रशुद्ध पद्धतीने माहितीचं संकलन केलं. याशिवाय मागील अनेक वर्षांच्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यांचे निकाल आणि त्यावेळचे प्रभावी घटक यांचाही अभ्यास केला. त्यामुळेच या संस्थेचा एक्झिट पोल इतका अचूक येऊ शकला आहे. या निकालानंतर या संस्थेची जोरदार चर्चा आहे. तसेच या अचूक अंदाजाबद्दल संस्थेचं कौतुकही होत आहे.
द स्ट्रेलेमा संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज होते?
या निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला. त्यानुसार भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होणार असं सांगण्यात आलं. उपलब्ध संसाधने आणि सहानूभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानूभूतीवर मात करेल असंही या निष्कर्षात नमूद करण्यात आलं होतं.
हेही वाचा :
आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर
चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं
कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग
व्हिडीओ पाहा :