लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात निकालावरून बरेच तर्क- वितर्क लावले जात आहे. राजकीय जाणकार या सगळ्यावर भाष्य करताना दिसत आहेत. राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलंय. महाराष्ट्रातील स्थिती काय असेल? यावर अनिल थत्ते यांनी अंदाज वर्तवला आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. त्यावर बोलताना 325-350 जागा महायुतीच्या येतील. 400 पार ही फार दूरची गोष्ट आहे. पण 350 च्या पार युती जाणार नाही, असं अनिल थत्ते म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांचं बंड आणि अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची घेतलेली भूमिका यामुळे राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गट विरूद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे. या मतदारसंघात काय होईल, असा प्रश्न विचारला असता अनिल थत्ते यांनी त्यांचा अंदाज सांगितला.
शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना आहे. त्या मतदारसंघात शिंदे गटाला जास्त जागा मिळतील. कारण पक्षाचा जो सोर्स होता, आमदार- कार्यकर्ते हे आता उद्धव ठाकरेंबरोबर नाहीत. 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे यांना होईल. शिंदे गटाच्या एक दोन जागा धोक्यात आहेत. पण इतर जागेवर त्यांचा विजय होऊ शकतो. त्यामुळे 10 ते 12 जागा शिंदे गटाला मिळतील, असं अनिल थत्ते म्हणाले.
काही जागांवर एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार बदलले याचा शिंदे गटाला फायदा होईल. याचं कारण असंय की तुम्ही निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्या नेत्या विरोधात एक लाट निर्माण होऊ शकते. याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी भाजपचा सल्ला ऐकला. हे चांगलंच झालं. त्यामुळे काही मतदारसंघात उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली आहे, असं अनिल थत्ते म्हणाले आहेत.