भाजपच्या गोटात हालचालींना वेग, महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी कधीही जाहीर होण्याची शक्यता

| Updated on: Mar 21, 2024 | 9:03 PM

महाराष्ट्रातील राजकारण आता वेगळ्या वळणावर येण्याची चिन्हं आहेत. कारण आता प्रचाराची रणधुमाळी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाजपात उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी आता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपच्या गोटात हालचालींना वेग, महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी कधीही जाहीर होण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

भाजपच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर सध्या प्रचंड बैठकांचं सत्र सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता तोंडावर आलं आहे. महिन्याभरात देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे. असं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मतदानाचा पहिला टप्पा जवळ आला आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा, त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरणं, त्या अर्जांची छाननी आणि नंतर उमेदवारी निश्चित होणं, त्यापुढे प्रचाराची रणधुमाळी या सर्व गोष्टी होणार आहेत. पण मतदानाला अवघा एकच महिना शिल्लक आहे.

अजून उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे प्रचारासाठी कदाचित वेळ कमी पडू शकतो. याच गोष्टीची धाकधूक आता भाजप आणि मित्रपक्षांनादेखील पडताना दिसत आहे. त्यामुळे भाजप आता पुढच्या 24 तासात महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची चिन्हं आहेत. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची पक्षातील हायकमांडसोबत ऑनलाईन बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप हायकमांड आणि फडणवीसांची फायनल ऑनलाईन बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. ही यादी येत्या 24 तासात येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा करणार आहेत. दिल्लीतील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची आजच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरु आहे की, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. पण सध्या आचारसंहिता लागलेली आहे आणि वेळदेखील कमी आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबईत असून व्यस्त आहेत. कारण अनेक जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वेगवेगळे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपच्या हायकमांडशी ऑनलाईन चर्चा करु शकतात. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. आज रात्री किंवा उद्या सकाळी ही यादी जाहीर केली जाऊ शकते.

निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघामध्ये येत्या 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी निश्चित करणं जास्त महत्त्वाचं आहे.