रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार
विनायक राऊत यांनी केली आहे.तसेच राणे यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. ॲड असीम सरोदे, अॅड. किशोर वरक ,अॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीता राऊत यांनी ही मागणी केली आहे.
भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे वि ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होता. लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाला आणि राणेंनी राऊत यांचा पराभव केला. मात्र, राणेंचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे. तेव्हापासूनच राणे व राऊत यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू असून राऊत यांनी आता ही नवी मागणी केली आहे.
काय म्हटले आहे नोटिशीत ?
निवडणूक प्रचार कालावधी हा 5 मे रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी सुद्धा सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. प्रचार संपलेला असतांनाही नारायण राणे समर्थक हे ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटिस मध्ये नमूद करण्यात आले आहे.
नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली. त्याचाही उल्लेख नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिस मधून केलेली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने 7 दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.
अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आलेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले.