लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अवघे पाच दिवस उरले आहेत. 4 जून रोजी सकाळपासूनच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. सुरुवातीला कल येतील. त्यानंतर दुपारपर्यंत निकाल येतील. त्यामुळे कुणाची सत्ता येणार? कोणता उमेदवार जिंकणार हे दुपारीच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी देवांचं दर्शन सुरू केलं आहे. निवडून येण्यासाठी देवाला साकडे घातले जात आहे. प्रत्येक उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तीन तगडे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांना आता काय वाटतं? याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर या उमेदवारांनी मनमोकळ केलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यात लढत होत आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच दोन शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत. यात इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत. तर चंद्रकांत खैरे हे माजी खासदार आहे. संदीपान भुमरे यांची लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. पण ते राज्याचे विद्यामान मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील ही सर्वात चुरशीच्या लढतीपैकी एक लढत ठरली आहे.
निवडणूक निकालाची तुम्हाला धाकधूक वाटतेय का? असा सवाल इम्तियाज जलील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलंय. मला काहीही धाकधूक नाही. या शहराचा निकाल आश्चर्यजनक येणार आहे. काहीही तर्क काढला जात आहे. पण मला काहीही भीती नाही. माझ्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, जिंकू किंवा हारू यापैकी एकच होणार आहे. लोकांसमोर जो पर्याय होता तो बघून वाटतं की, लोकांनी मला मतदान केलं आहे, असं इम्तियाज जलीली म्हणाले.
कुणी काहीही दावा करतं. ज्या उमेदवाराला 200 मते मिळणार आहे, तो पण म्हणतो की मी निवडून येणार आहे. त्यामुळे 4 जूनपर्यंत थांबा, घोडा मैदान समोरच आहे, अशी माझी भुमरे साहेबाना विनंती आहे. तरीही भुमरे आणि खैरे यांच्या आत्मविश्वासाला मी शुभेच्छा देतो. मी निवडून आल्यास शहराला आधी पाणी देणार, मनात आल्यास कधीही पाणी देता येऊ शकते, असं इम्तियाज जलील म्हणाले.
संदीपान भुमरे यांनीही आपल्या मनात कोणतीही धाकधूक नसल्याचं सांगितलं. माझा या मतदारसंघात विजय होणार आहे हे मला माहीत आहे. मला कमीत कमी 1 लाखाच्या पुढे मते मिळतील. एक लाख ते दीड लाख मतांनी मी निवडून येईल. मी पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री होतो. त्यामुळे मी महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात काम केलं. त्यामुळे मला ही लीड मिळेल. समोर विरोधक कोण आहे हे न पाहता आपण कसं निवडून येऊ हा विचार करून मी निवडणूक लढवली आहे, असं संदीपान भुमरे म्हणाले.
रोजगार हमी योजना खात्याचा मला ही निवडणूक लढवण्याचा मोठा फायदा झालेला आहे. विरोधक म्हणून इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांची तुलना करावी की नंबर दोनला कोण राहणार आहे. माझ्यात आणि नंबर दोनच्या उमेदवारात मोठा फरक असणार आहे. पालकमंत्री म्हणून साडेचार वर्षे काम केलं. नंतर मला पक्षाने लोकसभेची जबाबदारी दिली. त्यामुळे मला काही वाटत नाही. मी समाधानी आहे. निवडून आल्यानंतर माझ्यावर जबाबदारी असणार आहे. मी खूप काम करणार आहे. चंद्रकांत खैरे हे निष्क्रिय आहेत, मी येत्या आठ महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणार आहे, असं भुमरे म्हणाले.
धाकधूक असतेच असते, लहानपणी परीक्षा द्यायचो तेव्हा धकधक व्हायचं. पण पेपर चांगला गेला की बरं वाटायचं. धाकधूक असावी. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. माझा पेपर खूप सोपा गेला आहे. संदीपान भुमरे यांनी काय ईव्हीएम मशीन बदलल्या का? एक लाख मतांनी निवडून येणं कसं शक्य आहे? मी 10 हजार मतांनी का असेना पण मी निवडून येणार आहे. इम्तियाज जलील यांना कुठून मतदान पडणार? इम्तियाज जलील सोबत वंचित नाही. 22 टक्के मुस्लिम मतदान मला झालं आहे. हिंदू मतदान डिव्हाईड झालेलं नाही, त्यामुळे इम्तियाज जलील निवडून येणार नाही, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. संदीपान भुमरे यांना पालकमंत्री म्हणून काहीच समजत नाही. ते फक्त घोषणा करतात. लोकांना दिल्ली समजत नाही, असंही ते म्हणाले.