लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीला त्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत. महायुतीला कमी जागा का मिळाल्या याचं विश्लेषण महायुतीचे नेते करत असतानाच महायुतीचे नेते आणि राज्यातील बडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटील यांच्या या विधानाने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांची ही मेहनत पाहून एक मित्र या नात्याने मनात भीती वाटायची. प्रत्येकाला काही ना काही आजारपण असतात. तसं त्यांचंही आहे. तरीही त्यांनी मेहनत घेतली. ते खूप फिरले. पण त्यांना 9 खासदार मिळाले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षणाचा सल्लाही दिला आहे. खरं म्हणजे 2019ला युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांना घरीच बसायचं होतं त्यांच्या 13 आणि 8 जागा आज आल्या नसत्या. उद्धव ठाकरे यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी सल्ला देणारा नाही. पण उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका त्यांच्यावर बसला. मनसेच्या एका नेत्याने हा भगवा विजय नाही, हिरवा विजय आहे असं म्हटलं. हे समर्पक आहे. हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्या जागा 18 वरून 9 वर आल्या. 2019ला सोबत राहिले असते तर वाताहत झाली नसती. या सर्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बक्कळ फायदा करून घेतला. याचं विश्लेषण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. लोकसभेच्या धड्याहून अनेक गोष्टी नीट करता येतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या लोकसभेतील कामगिरीवर भाष्य केलं आहे. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. मी तीनचार दिवस प्रवासात आहे. त्यामुळे ते काय म्हटले ते नीट पाहतो. बऱ्याचदा आपण बोलतो एक आणि अर्थ वेगळा लागतो. मोहन भागवत आमचे पालक आहेत. घरात एखादी गोष्ट घडली तर पालकाला बोलायचा अधिकार असतो. सर्व घर गुडीगुडी चाललं तर तो नैसर्गिकपणा म्हणता येत नाही. पालकाच्या भूमिकेतून काही म्हटलं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. भाजप निवडणूक निकालाचं विश्लेषण करेल. विश्लेषण नीट करणारे असल्यानेच आम्ही दोन वरून एवढ्यावर आलो. मागे गेलो म्हणजे संपलो असं नाही, असं ते म्हणाले.
स्टॅटीस्टिक काही गोष्टी सांगतात. लोकसभा निवडणुकीत फटका बसत असताना पहिल्यांदा ओडिशात सरकार आलं. पूर्ण बहुमताचं सरकार आलं. अरुणाचलमध्येही सरकार आलं. सहयोगी पक्षाचं पाच वर्षाच्या गॅपमध्ये आंध्रात सरकार आलं. देशात एकूण तीन सरकार आले. अरुणाचल प्रदेश छोटं राज्य आहे. पण बाकीचे मोठे राज्य आहेत. भाजपला एकट्याला 241 जागा मिळाल्या आहेत. या सर्वांना मिळून 231 जागा मिळाल्यात. ग्लास अर्धा भरलेला आहे आणि ग्लास अर्धा रिकामा आहे, असं दोन्ही म्हटलं जातं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
प्रफुल पटेल यांना मंत्रिपद द्यायचं ठरलं होतं. पण एवढे घटक पक्ष असल्याने जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद द्यायचं ठरलं. पण पटेल यांनी नकार दिला. कारण पदावन्नती होईल असं त्यांना वाटलं. त्यामुळे राज्यमंत्रीपद घेण्यापेक्षा थोडी वाट पाहू असं ठरलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगेशी संवाद साधण्यात येईल. त्यांना फॅक्ट सांगण्याचं काम करणारच आहे. शुक्रवारी बहुतेक आम्ही सर्व भेटणार आहोत. त्यावेळी हा विचार करू. बसून काही समज आणि गैरसमज नीट केले पाहिजे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यातील अंमलबजावणीत काही अडचणी आहेत असं फिल्डवरचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्या काय अडचणी आहेत. ते पाहणार आहोत. जरांगे यांनी 10 जणांची टीम तयार केली पाहिजे. त्यांनी अभ्यासपूर्ण टीम केली तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील, असंही ते म्हणाले.