लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ -छोटा भाऊवरून वाद झाला. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सारवासारवही करण्यात आली. हा वाद थांबत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसमध्येही स्वबळाचा नारा घुमू लागला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने महाविकास आघाडीने 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधासनभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की जाणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत काय करायचं हा प्रश्न आमच्या लेव्हलचा नाहीये. महाविकास आघाडीचे नेतेच ते ठरवतील. पलिकडे तीन पक्ष आहेत. इकडेही तीन पक्ष आहेत. जागा वाटप करताना अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे जर 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार आला तर नक्की लढलं पाहिजे, असं अभिजीत वंजारी यांनी म्हटलं आहे.
288 जागा लढवण्यासाठी काँग्रेसकडे तेवडे उमेदवार आहेत का? असा सवाल वंजारी यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आमच्याकडे 288 जागांवर लढण्यासाठी उमेदवार आहेत. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. सर्वाधिक संख्या असलेला पक्ष आमचा आहे. विलासराव देशमुख यांच्या काळातही आमचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. आमचं वलय आणि वचर्स्व होतं. 288 उमेदवार मिळण्यास आम्हाला काही अडचण नाहीये, असं अभिजीत वंजारी म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी घेतलेल्या कष्टाबद्दल अभिनंदन केलं. विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यावर आहेत. दिवस फार कमी आहे. त्यात पाऊस आणि शेतीची कामेही आहेत. असं असलं तरी आपली संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा. आतापासूनच विधानसभेची तयारी करा. सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांची तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेसमधून ही प्रतिक्रिया उमटली आहे.