Explained : मतमोजणी नेमकी कशी केली जाते, मतमोजणीचा एक राऊंड किती मोठा असतो?…सर्वकाही जाणून घ्या

| Updated on: Jun 03, 2024 | 8:25 PM

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमुळे ( EVM ) मतमोजणी सोपी झाली आहे, त्यामुळे पहिल्या काही तासांनंतर देखील निकाल जाहीर होतात. उद्या मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. मतमोजणी कशी होते, मतमोजणीचे ठिकाण कोण ठरवते, मतमोजणीच्या फेऱ्या असतात आणि उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्र कसे दिले जाते हे जाणून घेऊया ?

Explained : मतमोजणी नेमकी कशी केली जाते, मतमोजणीचा एक राऊंड किती मोठा असतो?...सर्वकाही जाणून घ्या
How election counting is done, how long is a round of counting
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

18 व्या लोकसभेसाठी आता मतदानाची प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण होऊन आता निकालाची घटिका समिप आली आहे. आता अवघ्या काही तासांनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदानासाठी यंदा जवळपास सात प्रदीर्घ टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली गेली. एग्झिट पोलच्या माध्यमातून निवडणूकीत मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे याचा अंदाज सर्वांना आला आहे. आता प्रत्यक्षात कोणाचा विजय किती मतांनी होणार ? कोणाला किती जागा मिळणार आणि त्यामुळे बहुमताचा आकडा मिळून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्तात उद्या सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. इलेक्ट्रॉनिंग व्होटींग मशिन ( EVM ) मतगणना आता सोपी झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार आहेत. याची प्रचंड तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. तर कशी होते मतमोजणी आणि मतमोजणीचा एक राऊंड किती मोठा असतो हे पाहूयात….

भारतात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 64 च्या अनुसार मतांची मोजणी संबंधित निवडणूक संबंधित निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर ( आरओ ) यांच्या अखत्यारित केली जाते. एखाद्या क्षेत्रातील निवडणूक घेण्याचा जबाबदारी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होते. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा रिटर्निंग ऑफिसर सर्वसाधारणपणे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालाच केले जाते. एक जिल्ह्यात एकाहून अधिक निवडणूक मतदार संघ असल्यास अन्य सरकारी अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी बनविले जाते. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्याला राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक अधिकारी म्हणून जबाबादारी दिली जाते.

 निवडणूक निर्णय अधिकारी करतो जागेची निवड

केंद्रीय निवडणूक आयोगा निवडणूकांची घोषणा करतानाच मतमोजणीची देखील तारीख आणि वेळ निश्चित करुन त्याची घोषणा करते. सामान्यत: कोणत्याही मतमोजणीचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी  रिटर्निंग ऑफीसरच ( आरओ ) निर्धारित करते. सामान्यत: कोणत्याही मतदार संघात मतमोजणी एकाच जागी होते. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय जे सामान्यत: जिल्हा मुख्यालय असते, त्यालाच प्राथमिकता दिली जाते. मतमोजणी थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या ( रिटर्निंग ऑफीसर ) निगराणी खालीच होत असते. मतांची मोजणी एका मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये बंदीस्त जागेत विविध टेबल आखून त्यावर केली जाते.

उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित ही प्रक्रिया सुरु होते

मतदानानंतर जिल्हा मुख्यालय किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडलेल्या सुरक्षित जागेत स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशिन ( EVM ) कडेकोट बंदोबस्तात सीलबंद करुन ठेवली जातात. त्यांना मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँग रूममधून ईव्हीएम मशिन ( EVM ) बाहेर काढले जाते. त्यानंतर पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही ईव्हीएम यंत्रे उघडली जातात. यानंतर, रिटर्निंग ऑफिसरने नियुक्त केलेले मतमोजणी पर्यवेक्षक ( मतमोजणी कर्मचारी ) मतांची मोजणी करतात.

मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणी दरम्यान अडथळे

निष्पक्षता राखण्यासाठी, तीन-स्तरीय रँडमायजेशन प्रक्रियेद्वारे मतमोजणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तसेच मतदानावेळेच्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केलेली असते. मतमोजणीच्या वेळी सर्व पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष आपापल्या मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधींसह मतमोजणीच्या ठिकाणी सभागृहात उपस्थित असतात. मतमोजणीसाठी लावण्यात आलेले टेबल आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी तटबंदी किंवा अडथळे निर्माण केलेले असतात. बांबू किंवा बॅरिकेट्सद्वारे ही तटबंदी तयार केलेली असते. त्यामुळे मतमोजणीदरम्यान मतमोजणी प्रतिनिधी मशीनला हात लावू शकत नाहीत आणि संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली राहते.

पोस्टल मते आधी मोजली जातात

मतमोजणी केंद्रात जेव्हा नियोजित वेळेवर सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित पोस्टल मते आणि पोस्टल मतपत्रिकांची मोजणी प्रत्यक्ष आरओच्या देखरेखीखाली केली जाते. त्यासाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था करण्यात येते. तेथे सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असतात. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये ( ईव्हीएम मशिन ) टाकलेल्या मतांची मतमोजणी पोस्टल बॅलेटच्या मोजणीनंतर अर्ध्या तासाने सुरु केली जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित पोस्टल मतपत्रिका आणि पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने सुरू केली जाऊ शकते. यासाठी हे आवश्यक नाही की पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण व्हायलाच हवी. हेच नाही तर मतमोजणीसाठी व्होटींग मशिनच्या केवळ कंट्रोल युनिटचा वापर केला जातो. या प्रक्रियेत बॅलेट युनिटचा काही संबंध नसतो. यासाठी नशीब ते टेबलवर ठेवलेले नसते.

मतमोजणीच्या किती फेऱ्या असतात ?

मतमोजणी सुरु झाल्यानंतर जेव्हा 14 ईव्हीएम मशिन्समध्ये टाकलेल्या मतांची मोजणी पूर्ण होते, तेव्हा एक फेरी पूर्ण झाल्याचे मानली जाते. प्रत्येक फेरीचा निकाल एकाचवेळी घोषीत केला जातो. मतमोजणी पूर्ण झाल्यावर, निवडणूक अधिकारी ( रिटर्निंग ऑफिसर किंवा आरओ ) लोकप्रतिनिधी कायदा -1951 च्या कलम 66 मधील तरतुदींनुसार निकाल जाहीर करतात. त्यानंतर, विजयी उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्याकडून ( रिटर्निंग ऑफिसर ) विजयाचे प्रमाणपत्र दिले जाते.