लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएला बहुमताचा आकडा मिळाल्याने नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान पदाची रविवारी शपथ घेत आहेत. त्यांच्या शपथविधीला सात ते आठ हजार पाहुणे हजेरी लावणार आहेत. मोदी यांच्या सरकारमध्ये ज्यांना मंत्री पदाची ऑफर दिली जात आहे त्यांना फोन करून दिल्लीत बोलाविले जात आहे. याच गदारोळात आता मोदी यांच्या सरकारमध्ये राहुल गांधींवर नेहमी धारधार हल्ला करणाऱ्या स्मृती इराणी यांचा अमेठीत पराभव झाल्याने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे. कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघातून स्मृती इराणी तिसऱ्यांदा मैदानात उतरल्या होत्या. यापूर्वी साल 2014 मध्ये त्या राहुल गांधी यांच्या विरोधात हरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राज्यसभेतून संधी मिळाली होती.
लोकसभा 2014 मध्ये पराजय होऊनही केंद्रीय मंत्रिमंडळात स्मृती इराणी यांना स्थान कायम राहीले होते. हा पराभवानंतर स्मृती इराणी यांनी अमेठीला आपले दुसरे घर बनविले होते. आणि सातत्याने अमेठीतील जनतेशी संपर्क ठेवला होता. साल 2019 मध्ये त्यांनी अमेठीत लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी यांना हरवून आपले महत्व दाखवून दिले होते. राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर त्यांना बक्षिस म्हणून पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. यंदा राहुल गांधी यांना त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी असे चॅलेंज दिले होते. कॉंग्रेसने शेवटपर्यंत अमेठीचा सस्पेन्स कायम ठेवत अखेर किशोरी लाल शर्मा यांना मैदानात उतरविले. आणि राहुल गांधी स्वत: कॉंग्रेसचा पारंपारिक गड असलेल्या रायबरेली आणि वायनाड अशा दोन्ही ठिकाणांवरुन उभे राहीले आणि मोठ्या मतसंख्येने निवडून आले. अमेठीत मात्र स्मृती इराणी यांना किशोरी लाल शर्मा यांनी 1.67 लाख मतांनी धुळ चारली.
स्मृती इराणी यांनी किशोरी लाल शर्मा यांना राहुल गांधी यांचा नोकर म्हणून डीवचले होते. गांधी परिवाराशी कायम निष्ठावान असलेल्या किशोरी लाल शर्मा यांनी या मतदार संघातील विजयाचे मागील सर्व रेकॉर्ड तोडून टाकले. त्यांना 5,39,288 मते मिळाली. तर स्मृती इराणी यांना केवळ 3,72,032 मते मिळविता आली. के.एल. शर्मा हे 1,67,196 इतक्या मताधिक्याने निवडून आले. स्मृती इराणींना राहुल गांधी यांच्या पेक्षाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का ? याचे औस्तुक्य कायम आहे.