लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोल आल्यानंतर लागलीच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक पक्षांचे कुठे प्राबल्य दिसेल. कुठे हा पक्ष नवीन खाते उघडेल. कुठे त्याला फटका बसेल, याचे भाकीत केले होते. त्यांनी भाजपच्या निवडणुकीसाठीच्या धोरणाचे आणि रणनीतीचे कौतुक केले होते. त्यामुळे एक्झिट पोलनंतर ते काय प्रतिक्रिया देतील याविषयी उत्सुकता होती.
प्रशांत किशोर यांनी टोचले कान
प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचे कौल आल्यानंतर काही पत्रकार आणि नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी लोकांना आवाहन केले की नाहकच्या चर्चा आणि विश्लेषणात तुमचा अमूल्य वेळ फुकट वाया घालवू नका. त्यांनी अनेक एक्झिट पोलमध्ये भाजप नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळत असल्याच्या आकडेवारीकडे लोकांचे लक्ष वेधले.
असा दाखवला आरसा
” पुढील वेळी ज्यावेळी निवडणुका असतील आणि राजकीय चर्चा होईल, त्यावेळी तुमचा अमूल्य वेळ या बोगस पत्रकार, भंपक नेते आणि स्वयंभू मीडिया विश्लेषकांच्या दळभद्री चर्चेसाठी वाया घालवू नका’, प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोल आणि त्यानंतरच्या गोंधळावर अशी खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे.
एक्झिट पोल 2024 चे निकाल हाती येण्यापूर्वी काही तास अगोदर प्रशांत किशोर यांनी ‘द प्रिंट’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत भाजप नेतृत्वातील एनडीए जोरदार कामगिरी बजावणार असल्याची यापूर्वीच भविष्यवाणी त्यांनी पुन्हा केली.
भाजप करणार कमाल
गेल्या निवडणुकीपेक्षा भाजप चांगली कामगिरी बजावेल असे भाकीत प्रशांत किशोर यांनी केले होते. पश्चिम आणि उत्तर भारतातील जागांमध्ये फारसा बदल होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले होते. तर पूर्व आणि दक्षिण राज्यातील मतदान खेचण्यात भाजप यशस्वी होण्याचा दावा त्यांनी खूप पूर्वी केला होता. तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजप लक्षणीय कामगिरी करुन दाखवेल, हे त्यांचे भाकीत, एक्झिट पोल पण मान्य करत आहेत. तर कर्नाटकमध्ये भाजप दमदार कामगिरी करेल. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मात्र भाजपला फटका बसेल असा त्यांचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकांमध्ये असंतोष नसल्याचे त्यांनी सांगितले.