देशात एकूण 7 टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात सुरु आहे. महाराष्ट्रात मतदारांनी महायुतीला नाकारात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर विजयी केलं. मविआच्या महाराष्ट्रात एकूण 48 पैकी 29 जागांवर उमेदवार विजयी झाले. तर मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर मविआचा विजय झाला. निकालानंतर काही ठिकाणी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी पराभवामुळे शुकशुकाट आहे. मविआला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त केला. तसेच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही म्हटलं. तसेच ठाकरेंना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ठाकरेंनी काय उत्तर दिलं, हे आपण जाणून घेऊयात.
इंडिया आघाडी उद्या सत्तास्थापनेबाबत एक्सप्लोर करणार का? तसेच पंतप्रधान पदाबाबत तुम्ही चर्चा करणार का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “निश्चितच सत्तास्थापनेचा दावा करणार. जसं की मी आता म्हटलं की ज्यादिवशी इंडिया म्हणून आमची आघाडी झाली. तेव्हाच आमच्या सर्वांचं ठरलं होतं की कुणा एका व्यक्तिला नाही, पण देशातील हुकुमशाही संपवायची. संविधान वाचवायचं हवं. मग सर्व ठरवून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकतो. मला वाटतं की ते उद्या होईल”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी तुम्ही अपक्ष आणि इतर पक्षांनासोबत घेणार का? असा प्रश्नही ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ठाकरे म्हणाले की, ” जे पण यांच्यापासून (भाजप सरकार) त्रस्त आहेत, ते सर्व आमच्यासोबत येतील. सर्व देशभक्त आमच्यासह येतील. चंद्रबाबू यांनाही भाजपने फारत त्रास दिला. ज्यांना त्रास दिला ते सर्व आमच्यासोबत येतील”, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मविआला जास्त जागा मिळाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, “मविआचा महाराष्ट्रातील निकाला नक्कीच चांगला आहे. मात्र मला आणखी जागा अपेक्षित होत्या. आणखी 2-4 जागांची अपेक्षा होती. आम्ही 48 जागा लढवल्या, त्यापैकी सर्व जागा जिंकायच्या होत्या, आशा तशी होती, विश्वासही होता. काही ठिकाणी गडबड झाली आहे, अशी शंका येऊ शकते”.