लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. सत्तेचा मार्ग दिसत असला तरी तिथपर्यंत पोहोचणं मित्रपक्षांशिवाय शक्य नाही. त्यामुळे आता भाजपाला मित्रपक्षांपुढे झुकावं लागणार आहे. असं असताना राज्यातही भाजपाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेच्या 23 जागांवरून थेट 9 जागांवर घसरण झालेली आहे. राज्यात सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्या खालोखाल उद्धव ठाकरे गटाला यश मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं. तसेच केंद्रात सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबतही त्यांनी आपलं थेट मत व्यक्त केला आहे. सत्ता स्थापनेसाठी नक्कीच दावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.”सत्ता स्थापनेसाठी दावा करायला पाहीजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी दुपारनंतर जाईन.आज मला मुंबईतील खासदार भेटायला आले आहेत. उद्या मुंबई बाहेरचे खासदार भेटायला येणार आहेत. सर्वात आधी संजय राऊत तिथे जातील आणि त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई असतील. मी संध्याकाळच्या वेळेला मी तिथे पोहोचेन.”असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
” पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याच्याबाबत चर्चा होईल. इंडिया आघाडी म्हणून आम्ही तयारी केली. तेव्हा आमच्यापैकी कोणीही आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहे असं सांगितलं नाही. देशातील लोकशाही वाचवली पाहीजे, संविधान वाचवलं पाहीजे आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहीजे, ही आमची भावना होती. उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवला जाईल आणि त्याला आम्ही सर्व समर्थन देऊ.”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“सर्व छोटे मोठे पक्ष आम्ही एकत्र येऊ. भाजपाने त्या सर्वांना त्रास दिला आहे. चंद्रबाबू नायडू यांना सुद्धा भाजपाने कमी त्रा दिला नव्हता..नितीश कुमार यांना काय कमी त्रास दिला. पुन्हा हा त्रास हवा का हा देखील प्रश्न आहे. एकदा हे गेलेलं सरकार जे उंबरठ्यावर त्यांना घालवण्यासाठी आणि सर्वच जण एकत्र येतील. त्यामुळे नक्कीच ते भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येतील.”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे यांनी सांगलीत महाआघाडीचा धर्म पाळला गेला नसल्याचा आरोपही केला आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. तसेच चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलं होतं.