देशातील 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणूकांचे निकाल धक्कादायक आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए हीला तिसऱ्यांदा सरकार बनविण्याची संधी चालून आली आहे. साल 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांच्या विपरित यंदाचे निकाल आले आहेत. यावेळी भाजपाला 272 चा जादूई गटाचा आकडा गाठता आलेला नाही. N फॅक्टर या निवडणूकांमध्ये महत्वाचा ठरणार आहे. निवडणूकांचे निकाल येऊ लागले आहेत. या निकालांवर एन फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. नमो, नितिशकुमार, आणि चंद्राबाबू नायडू यांच्या सहकाऱ्याशिवाय नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करता येणार नसल्याचे चित्र आहे.
ताज्या निवडणूक निकालानुसार एनडीएला 296 जागा मिळण्याची चिन्हे आहेत. परंतू भारतीय जनता पार्टीला लागोपाठ तिसऱ्यांदा बहुमताचे स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार बनवून पंडित जवाहरलाल नेहरु यांचा रेकॉर्ड करण्याची संधी होती. आता पंडित नेहरु यांचा रेकॉर्ड करण्यासाठी पीएम मोदी यांना अन्य दोन एन म्हणजे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची गरज लागणार आहे. नितीश आणि नायडू यांची मर्जी राखतच आता सरकार चालविण्याची नौबत सरकार वर आली आहे. नितीश कुमार यांचे जनता दलाला ( युनायटेड ) 14 जागा मिळाल्या आहेत. तर तेलगु देशम पार्टीला ( टीडीपी ) ला 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही एनडीएचे घटक पक्ष आहेत.
आता एनडीए 295 जागांवर आघाडीवर चालली आहे. तर यातून दोन्ही मित्रपक्षांच्या 30 जागा कमी केल्या तर भाजपाचे संख्याबळ 265 वर घसरेल. त्यामुळे 272 चा बहुमताचा आकडा गाठणे अशक्य होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची तिसरा कार्यकाळ नितीशकुमार आणि नायडू यांच्या मर्जीवर अवलंबून राहणार आहे. त्यातच इंडिया आघाडीला देखील 230 च्या जवळपास जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एनडीए सोबत इंडिया आघाडी देखील सरकार स्थापणेसाठी मित्र जोडण्याच्या कामाला लागली आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीडीपी पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचवेळी बिहार भाजपचे अध्यक्ष आणि त्यांच्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी सीएम हाऊस येथे पोहोचले. मात्र, सम्राट चौधरी नितीश कुमारांना भेटू शकले नसल्याच्या बातम्या येत आहेत. नितीश यांनी एक दिवस आधी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. आता नितीशकुमार भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांना भेटू न शकल्याने राजकीय वातावरण बदलले आहे. आपण सूडाच्या राजकारणाच्या बाजूने नसल्याचे नितीश कुमार यांनी म्हटलेले आहे. आणि ते कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. मात्र, जेडीयूचे सरचिटणीस आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.