लोकसभा निडणूक 2024 चे निकाल समोर आले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागल आहेत. अनेक निकालांची चर्चा झाली, त्यापैकीच एक निकाल होता अहमदनगरमधील पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांना २८ हजार मतांनी हरवत लंके यांनी विजय संपादन केला. विद्यमान खासदाराला हरवून शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यंनी विजयश्री खेचून आणली. कोरोनाकाळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा झालेला दिसला. आता ते थेट संसदेत अहमदनगरचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने ते बरेच चर्चेत आले होते. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. मात्र शरद पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अमहदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत लंके यांना 6 लाख 24 हजार 707 इतकी मतं मिळाली. तर भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या पारड्यात 5 लाख 95 हजार868 मतं पडली. या निवडणुकीत दणदणती विजय मिळवणार हे निलेश लंके कोण आहेत, ते जाणून घेऊया.
निलेश लंके यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 साली झालेल्या विधानलभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवताना त्यांनी तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला. त्यांचा जन्म 10 मार्च 1980 साली झाला. लंके यांचे वडील हे शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर लंके यांनी आयटीआय केलं, काही काळ कंपन्यांमध्येही काम केलं. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. मात्र काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली.
राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली ?
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेल्या लंके यांनी राजकारणाची सुरूवात शिवसेनेतून केली. वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. पक्षात काम करताना गावचा जनाधार मिळवत त्यांनी हंगा गावची ग्रामपंचायत निवडणूक जिंकली. मात्र 2018 साली झालेल्या एका वादानंतर त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं.
त्यानंतर लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 साली त्यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव करत ते विजयी झाले.
कोरोना काळात अनेकांना वाचवलं
कोरोना काळात लंके यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, त्याचा परिणाम उपचारांवर होत होता. हे लक्षात घेऊन , रुग्णांना उपचार मिळावेत याासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं. या कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा होत्या, जेवणाची आणि उपचारांची सोयही करण्यात आली. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं. त्यांच्या या कामाचा त्यांना निवडणुकीत बराच फायदा झाल्याचं दिसून आलं