जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. ठिक 8 वाजता देशभरातील 543 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. देशात महायुतीचं सरकार की इंडिया आघाडीचं? महाराष्ट्रात काय चित्र असणार? महायुती जिंकणार की महाविकास आघाडी? याची सर्वांमध्येच उत्सुकता आहे. मात्र निवडणुकीच्या मतमोजणीआधी एका जागेचा निकाल मात्र स्पष्ट झाला आहे. या ठिकाणी भाजप विजयी झाली आहे.
गुजरातमधील सूरत या लोकसभा मतदारसंघाचा निकाल स्पष्ट झाला आहे. सूरत या लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. गुजरातच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. सूरतच्या जागेवर पहिल्यांदाच कुणी व्यक्ती बिनविरोध निवडली गेली आहे. विना मतदान घेता मुकेश दलाल हे निवडले गेले आहेत. मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीने सूरतसह गुजरातमध्ये इतिहास रचला गेला आहे.
सूरतमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुकेश दलाल रिंगणात होते. तर काँग्रेसकडून निलेश कुंभानी यांनी देखील अर्ज दाखल केला होता. अशात निलेश कुंभानी यांचा निवडणूक अर्ज बाद ठरवला गेला. तर इतर उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला. त्यामुळे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.
भाजप मुख्यालयाजवळ होम हवन केलं जात आहे. भाजपच्या विजयासाठी होम हवन सुरू आहे. आज लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दिल्लीत मोठ्या हालचाली घडणार आहेत. भाजप कार्यालयात जल्लोष केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करणार नाहीत. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजपच्या विस्तार कार्यालयात विजयोत्सव होणार आहे. सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान भाजपच्या विस्तार कार्यालयात पोहोचतील. तिथे ते संबोधित करणार आहेत.