लोकसभा निवडणूक 2024 च्या सातही टप्प्यातील मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. देशभरात सर्वत्र मतमोजणी सुरू असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र याचदरम्यान कल्याणमध्ये मात्र निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार दिसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे कल्याणमध्ये मतमोजणी काही काळासाठी थांबली. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी डोंबिवलीच्या क्रीडा संकुलामध्ये मतमोजणीचे आयोजन करण्यात आले. मात्र सकाळपासूनच काही ना काही गोंधळ दिसत होता. ८ वाजत मतमोजणीला सुरूवात होणार होती, पण त्यापूर्वीच या भागातील लाईट गेले होते. एवढंच नव्हे तर तेथील वायफायही बंद होते, धड स्पीकरही सुरू नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे मतमोजणील उशीरा सुरूवात झाली. तसेच तमोजणी ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना माहिती मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. थोडा वेळ सुरळीत कारभार झाल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि मतमोजणी पुन्हा थांबली. आता हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू असून मतमोजणीला पुन्हा कधी सुरूवात होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याणमध्ये आघाडीवर कोण ?
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर असा सामना असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत ठाकरे हे आघाडीवर आहेत. श्रीकांत शिंदे हे फक्त 203 मतांनी आघाडीवर आहेत.
कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा श्रीकांत शिंदे यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ठाकरे वि शिंदे असा हा सामना असून दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. आज मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच आता ही जागा कोण जिंकतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कल्याणचं दोनदा प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा बाजी मारून पुन्हा संसदेत दिसतात की शिवसेनेच्या वैशाली दरेकर त्यांना धक्का देत बाजी पलटवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.