लोकसभेचे निकाल आले आहेत. केंद्रात एनडीएचे बहुमत ( 292 जागा ) मिळाल्याने भाजपाचे सरकार होण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला देखील 230 जागा मिळाल्याने राहुल गांधी यांचा देखील नेतृत्व म्हणून राजकीय क्षेत्रावर उदय होत आहे. त्यातच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 29 जागा मिळाल्या आहेत. त्यात कॉंग्रसेला सर्वाधिक 13 खासदार मिळाल्याने कॉंग्रेसला नव संजिवनी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 अशा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा उत्साह वाढला असून मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य पसरले आहे.
लोकसभा 2024 चा निकाल 4 जून रोजी लागला आहे. त्यातील निकाल धक्कादायक आहेत. आणि अनेक लढतील मार्जिन इतके कमी आहे की शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. आता महाराष्ट्रात लागलीच विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणूका दिवाळीच्या आधीच उरकण्याची तयारी आहे. लोकसभेतील विजयामुळे प्रत्येक पक्षाने एका लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्राप्रमाणे आपल्याला विधान सभेत किती आमदार मिळतील याचे आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर्स महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावायला सुरुवात केली आहे. या लोकसभा निवडणूकीतील यशाच्यामुळे आता सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसला सर्वाधिक खासदार मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरात पोस्टर्स कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
कॉंग्रेसला महाराष्ट्रात 13 खासदार मिळाल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पोस्टर्स महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी नागपूरात जागोजागी नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली आहेत. साल 2019 लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली होती. आता साल 2024 च्या लोकसभा निवडणूकात महाराष्ट्रात थेट 13 जागा निवडून आल्याने कॉंग्रेस महाविकास आघाडीतीस सर्वात मोठा पक्ष ठरली आहे.