भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उद्या, रविवारी ( 9 जून) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. काल एनडीएच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर नेरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएच्या घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन पत्र सुपूर्द केलं. यानंतर आता, रविवारी मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. जय्यत तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली ही नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. ड्रोन उडवणे, पॅराग्लायडिंग करणे यावरही बंदी आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केले जातील. परिसरातील उंड इमारतीवर अँटी ड्रोन सिस्टीमही तैनात करण्यात आली आहे. एनएसजीकडे उपलब्ध असलेली ड्रोनविरोधी यंत्रणा शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केली जाईल. एनएसजीच्या मदतीने, डीआरडीओ अँटी ड्रोन सिस्टीमवरही नजर ठेवत आहे. सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी, घुसखोरी चेतावणी प्रणाली (Intrusion Warning System) आणि फेस आयडेंटिफिकेशन एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच गुप्त जागा आणि उंच इमारतींवर स्नायपर तैनात करण्यात येणार आहेत.
बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शहरातील लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय या हॉटेल्सना यापूर्वीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
राजधानीत ‘हाय अलर्ट’, 3 त्रिस्तरीय सुरक्षा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शपथविधी समारंभासाठी दक्षिण आशियाई असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन सदस्य देशांतील मान्यवरांना आमंत्रित केल्यामुळे राष्ट्रीय राजधानी ‘हाय अलर्ट’वर असेल. सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे SWAT आणि NSG कमांडो तैनात असतील. शपथविधीसाठी दिल्लीत त्रिस्तरीय सुरक्षा (तीन स्तर) असणार आहे.
या देशांचे प्रमुख शपथविधीसाठी राहणार उपस्थित
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे अध्यक्ष वेव्हेल रामखेलावन यांना आमंत्रित केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. दहल रविवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत.
नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर काल, शुक्रवारी (७ जून) एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. एनडीएतील घटक पक्षांच्या सर्व नेत्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली.
एनडीएने 292 तर भाजपने 240 जागा जिंकल्या
यानंतर मोदींनी राष्ट्रपतींसमोर सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना 9 जून रोजी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. मोदी सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला 292 तर भाजपला 240 जागा मिळाल्या.