लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात मतदान झाले असून आज मतमोजणीला झाली. देशभरासह महाराष्ट्रातील निकालही समोर आले असून रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी झाले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदावर अनंत गीते यांना पराभूत करत 82 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. या एकमेव विजयामुळे अजित पवार गटाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
रायगडमधील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. तटकरे वि. अनंत गीते यांच्यातील ही लढत अटीतटीची होईल असे मानले जात होते. मात्र आज सकाळी ( 4 जून) मतमोजणी सुरू झाल्यावर तटकरे यांनी पहिल्या फेरीपासूनच शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली आणि अखेर विजय संपादन केला. या निवडणुकीत सुनील तटकरे यांना 5 लाख 08 हजार 352 इतकी मतं मिळाली तर अनंत गीते यांच्या पारड्यात 4 लाख 25 हजार 568 इतकी मतं पडली. तटकरे यांनी 82 हजार 784 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांचा विजय निश्चित होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सलग दुसऱ्यांदा तटकरे यांनी गीते यांचा पराभव करून घवघवीत यश मिळवलं.
रायगड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
रायगड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातून वेगळा झाला. या मतदार संघात 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली. 15 लाख 32 हजारांहून अधिक मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा काबीज केली आहे. शिवसेनेने येथे पहिली आणि दुसरी निवडणूक जिंकली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला होता.
रायगड लोकसभा जागेवर 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये काँग्रेसने ए. आर. अंतुले तर शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अनंत गीते यांना 4,13,546 मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक 1,46,521 मतांनी जिंकली. तर काँग्रेसचे ए.आर. अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली.
मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी जोरदार टक्कर दिली. अनंत गीते यांचा केवळ 2110 मतांनी विजय झाला. त्यांना 3,96,178 मते मिळाली. तर सुनील तटकरे यांना 3,94,068 तर शेकापचे उमेदवार भाई रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली. 20,362 मतदारांनी NOTA बटण दाबले. पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मागील निवडणुकीचा बदला घेत शिवसेनेच्या अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला. त्यांना 4,86,968 तर गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती.
रायगड लोकसभा मतदारसंघात 58.10 टक्के मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघात आधीच्या तुलनेते यंदा यावेळी मतदान घटलं. यावेळी 58.10 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 सालच्या तुलनेत हे मतदान 7 टक्के कमी झालं. 2019 ला रायगड लोकसभा मतदार संघात 65.06 टक्के मतदान झालं होते. मात्र यंदा मतदान घटलं असून त्याच फटका कोणाला बसतो, याचीही चर्चा सुरू आहे. यंदा सुनील तटकरे त्यांची विजयी परंपरा कायम राखतात की गीते त्यांना हरवून मागच्या पराभवाचा वचपा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स