सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. सहाव्या फेरीअखेर विशाल पाटील यांनी 30 हजार 659 मतांची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याऐवजी कॉंग्रेसने आपली सर्व यंत्रणा विशाल पाटील यांच्या मागे उभी केली होती. मात्र, त्यामुळेच विशाल पाटील यांना भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करता आले. सहाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 30 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे संजयकाका पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, पुणे या मतदारसंघानंतर सर्वाधिक लक्ष सांगली मतदार संघावर होते. करण, महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ वादग्रस्त ठरला होता. कॉंग्रेसने या मतदार संघावर आपला दावा सांगितला होता. मात्र, ठाकरे गटानेही येथे दावा सांगितला. तसेच, चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करून कॉंग्रेसची गोची केली. काँग्रेसने नाराजी दर्शवून विशाल पाटील यांच्यासाठी दिल्लीवारी केली. पण, ठाकरे गट या जागेवर कायम राहिल्याने अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी आपल्री सर्व ताकद विशाल पाटील यांच्या मागे उभी केली होती. त्यामुळे सांगलीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिहेरी लढत झाली. नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलमध्ये सांगलीची जागा अपक्ष उमेदवार जिंकू शकता असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसारच सांगलीमध्ये विशाल पाटील विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. सांगली लोकसभेसाठी जवळपास 61 टक्के मतदान झाले होते.