शिंदेंचे शिलेदार कृपाल तुमाणे यांनी दाखवला महायुतीला आरसा; ‘त्या’ विधानांची चर्चा

| Updated on: Jun 05, 2024 | 10:42 PM

"जुन्या उमेदवारांना डावलण्याचा फटका बसला हे नक्की आहे. कारण जुन्या उमेदवारांचा संपर्क मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये असतो. नवीन उमेदवार दिल्यानंतर त्याला गावापर्यंत पोहोचायला मोठ्या प्रमाणात वेळ लागत असतो", अशी भूमिक कृपाल तुमाणे यांनी मांडली.

शिंदेंचे शिलेदार कृपाल तुमाणे यांनी दाखवला महायुतीला आरसा; त्या विधानांची चर्चा
महायुती
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते कृपाल तुमाणे यांनी महायुतीला आरसा दाखवला आहे. महायुतीला राज्यात लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालेलं नाही. यामागे नेमकं कारण काय आहे, याचं विश्लेषण कृपाल तुमाणे यांनी मुद्देसूदपणे केलं आहे. “सगळी जबाबदारी आमच्या तीनही पक्षांची होती. तीनही पक्षांनी प्रयत्न करून 40 प्लस जागा होतील यासाठी काम केलं. मात्र काही मतदारांच्या मनात काँग्रेसने गैरसमज निर्माण करण्याचं काम केला. आम्ही मागे पडलो, असं कृपाल तुमाणे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गरज या सरकारमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. ते मंत्रिमंडळात चांगले निर्णय घेतात. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देण्याची काही गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहूनच पक्षाचे काम करायला पाहिजे, असं मला वाटतं”, अशी भूमिका कृपाल तुमाणे यांनी मांडली.

“काही ठिकाणी आम्ही विलंबाने तिकीटं जाहीर केलं, उमेदवार बदलले. त्याचा फटका आम्हाला बसला आहे. नाशिकची सीट, मुंबईची सीट, ठाणे, रामटेक या विलंबाने जाहीर करून काही बदल केला. काही ठिकाणी उमेदवार नवीन आले. भावना गवळी लढल्या असत्या तर तिथली सीट आम्ही जिंकली असती. हिंगोलीची सुद्धा सीट आम्ही जिंकली असती. रामटेकची जागा ही मी नक्कीच जिंकलो असतो आणि 13 ते 14 जागा आम्ही काढल्या असत्या. आमचा राज्यामध्ये चांगला स्ट्राइक रेट राहिला असता. आजही शिवसेनेचा राज्यात चांगलाच आहे”, असं कृपाल तुमाणे म्हणाले.

“जुन्या उमेदवारांना डावलण्याचा फटका बसला हे नक्की आहे. कारण जुन्या उमेदवारांचा संपर्क मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये असतो. नवीन उमेदवार दिल्यानंतर त्याला गावापर्यंत पोहोचायला मोठ्या प्रमाणात वेळ लागत असतो”, अशी भूमिक कृपाल तुमाणे यांनी मांडली. “रामटेक, यवतमाळमध्ये सुद्धा तेच झालं तिथे मोठ्या प्रमाणात गाव आहेत. तिथल्या लोकांच्या तोंडात जुन्या उमेदवाराचे नाव होतं. मात्र तिथे उमेदवार बदलला. त्यामुळे नुकसान झालं हे मी नक्की सांगू शकतो”, असं मत कृपाल तुमाणे यांनी मांडलं.

‘आम्ही बैठकीत चिंतन करणार’

“आमची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सगळे नेते आतापर्यंत काय घडलं आणि काय करायला पाहिजे या संदर्भात बैठक होणार आहे. त्यात आम्ही चिंतन करणार आहोत. आता जे झालं ते झालं. मात्र पुढच्या निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स कसा करू, यासाठी आम्ही बैठकीत चिंतन करणार आहोत. कारण आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आणायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री होतील”, असा दावा कृपाल तुमाणे म्हणाले.

“जागा बदलण्यात कोणाचा दबाव काय होता हे सगळ्यांनाच माहीत आहे जे झालं ते जाऊ द्या मात्र त्याचा फटका महायुतीला बसला हे नक्की एखादं वेळ कोणी आग्रह करतो तर त्याचा आग्रह मान्य करावा लागतो मात्र ज्यांनी जागा बदलाव्या लागल्या त्यांनी आता त्याचं आत्मचिंतन करावं”, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाणे म्हणाले.