नवी दिल्लीमध्ये NDA संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. त्यामुळे देशात पुन्हा भाजप एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. भाजप कार्यालयाबाहेर पुन्हा एकदा मोदी सरकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर, दुसरीकडे वाराणसीमध्ये मोदी यांच्या विरोधात लढणारे कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांच्या पराभवानंतरही काँग्रेसचे कार्यकर्ते पेढे वाटून जल्लोष करत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपपेक्षा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला जास्त जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाला 37 तर भाजपला 33 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसलाही 6 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला अपेक्षित असे हे यश आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान आले आहे. त्यातही मोदी यांच्या विरोधात पराभूत झालेले अजय राय यांच्याबद्ल काँग्रेस कार्यकर्त्यांना विशेष अप्रूप वाटत आहे.
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढविणारे अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. लखनऊमध्ये आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अजय राय यांचा निवडणुकीमध्ये दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. मात्र, अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांनी कडवी टक्कर दिली, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. कारण आधीच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे अंतर खूपच कमी झाले आहे. त्यामुळे पराभूत झाले तरी मोदी यांच्या मतांचे अंतर कमी झाल्याचा आनंद कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
वाराणसी लोकसभा मतदार संघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील शहर दक्षिणमध्ये मोदी यांना 97878 मते तर अजय राय यांना 81732 मते मिळाली. येथे मोदी यांनी 1032 मतांची आघाडी घेतली होती. मोदी यांना शहर उत्तर मध्ये 131241, वाराणसी कॅन्टमधून 145922, रोहनिया 127508 आणि सेवापुरी विधानसभा मतदारसंघातून 108890 मते मिळाली. तर याच मतदारसंघातून अजय राय यांना अनुक्रमे 101731, 87645, 101225, 86751 अशी मते मिळाली आहेत. मतांची ही आकडेवारी पहाता राय यांनी मोदी यांना काटे की टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. अजय राय यांच्या याच कामगिरीवर काँग्रेस कार्यकर्ते खुश झाले आहेत.