ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी तुल्यबळ उमेदवार असणारे सुभाष भोईर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उमेदवार नाही अशी स्थिती होती. मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत पाहायला मिळणार का? याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मोठे कार्य कल्याण लोकसभा क्षेत्रात आहे. येथील बहुसंख्य समाज हा दिघे यांना मानणारा आहे. विशेष म्हणजे कल्याण लोकसभेत मविआचा उमेदवार कोण? यावर बरेच दिवस चर्चा सुरु होती. त्या चर्चेतून आता आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचं नाव पुढे येतंय. कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे केदार दिघेंना तिकीट देण्याचं बोललं जातंय.
मात्र शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा लढतीपेक्षाही कल्याण मतदारसंघ स्थानिक गटबाजी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं चर्चेत राहिलाय. कारण स्थानिक भाजपनं कल्याणच्या जागेवर दावा सांगितलाय. तर बारामतीत शिवतारेंच्या भूमिकेनं ठाण्यातली अजित पवारांची राष्ट्रवादीही इशारा देतेय.
कल्याण लोकसभेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा या 6 विधानसभा येतात. 2019 ला शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील लढले होते. श्रीकांत शिंदेंना 5,59,723 तर राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटलांना 2,15,380 मतं मिळाली होती. शिंदेंचा 3,44,343 मतांनी विजय झाला होता. अंबरनाथ- उल्हासनगर- कल्याण पूर्व- डोंबिवली- कल्याण ग्रामीण- या पाचही मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना लीड होतं. डोंबिवलीतून शिंदेंना सर्वाधिक म्हणजे 92 हजार 990 मतांनी आघाडीवर राहिले. तर मुंब्रा-कळव्यातून बाबाजी पाटील आघाडीवर होते.
यंदा मात्र स्थानिक वादांनी कल्याण लोकसभा चर्चेत आहे. दिव्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत कल्याणची जागा कमळ चिन्हावर लढवण्याची मागणी झाली. याशिवाय बारातमी लोकसभेतील वादाचे पडसाद कल्याण लोकसभेत पडू नये, याचीही दक्षता महायुतीला घ्यावी लागणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाचं राहण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी नुकतंच काही दिवसांपू्र्वी शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली होती. विशेष म्हणजे भाजपकडून सातत्याने या लोकसभा जागेवर दावा सांगितला जातोय. मतदारसंघात भाजपची ताकददेखील आहे. पण कल्याण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालिकेल्ला राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेनाचा नेहमीच कल्याणवर दावा राहिलेला आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे.
शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. आणि आता तर दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे असणार आहेत. त्यात भाजपकडून शिंदेंना हवा तसा पाठिंबा मिळाला नाही तर त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे केदार दिघे यांना महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो. पण तरीही या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे. महायुती एकसंघ राहिली तर ही लढ काँटे की होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक महत्त्वाची राहण्यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. ते दोनवेळा कल्याणचे खासदार राहिले आहेत. पण आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे ही निवडणूक श्रीकांत शिंदे जिंकतात का? याबाबत स्थानिकांच्या मनात उत्सुकता आहे.