साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सत्तेवर येतायत. त्यामुळे भाजपमधील (BJP) त्यांचा मानमरातब आणि रुतबा आपसुकच वाढलाय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) नंतर ते सर्वात शक्तीशाली नेते म्हणूनही ओळखले जातील. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो. येथे लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळेच तर साऱ्याच पक्षांनी उत्तर प्रदेशासाठी आकाशपाताळ एक केले. मात्र, येथे जादू चालली ती फक्त योगी आणि मोदी यांची. मोदी यांच्या प्रतिमेचे जितके श्रेय या विजयासाठी घेतले जाईल. तितकेच श्रेय योगींनाही द्यावे लागेल. त्यामुळे ते भाजपमध्ये एक शक्तीशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. ते कसे हेच जाणून घेऊ.
ऐतिहासिक विजय
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी आज मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरणारा आहे. ही कामगिरी त्यांची दोन दृष्टीने या राज्यात ऐतिहासिक ठरणार आहे. पाच वर्षाचा कालखंड संपल्यानंतर 1985 नंतर पुन्हा दुसऱ्यांदा सत्तेवर येणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री आहेत. यापू्र्वी अनेक मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये दोनदा सत्तेवर आले. मात्र, यापैकी कोणीही पहिल्या सत्ताप्राप्तीवेळी पाच वर्षांचा कालखंड पूर्ण केला नाही. त्यात संपूर्णानंद,चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा अशी नावे आहेत. विशेष म्हणजे योगी यांच्या नेतृत्वात त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येतोय. अशी कामगिरी सुद्धा एकाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही पक्षाने यापूर्वी केली नाही.
कडवे हिंदुत्व
योगींची दुसरी ओळख म्हणजे मोदींप्रमाणे त्यांचे कडवे हिंदुत्व. विशेष म्हणजे योगी यांनी विज्ञानाची पदवी घेतलेली आहे. मात्र, राम मंदिर आंदोलनाने त्यांचे जीवन बदलून टाकले. 1993 साली विज्ञानाच्या एमएस्सीसाठी प्रवेश घेतलेला विद्यार्थी अचानक आपले काका महंत अवैद्यनाथ यांना शरण जातो काय आणि 1994 मध्ये सन्यासी होतो काय, सारे कल्पानातित म्हणावे लागेल. त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये त्यांच्यावर आझमगढ येथे प्राणघातक हल्ला झाला. मोदीचे नाव ज्याप्रमाणे कुप्रसिद्ध अशा गुजरात दंगलीशी जोडले आहे, त्याच प्रमाणे योगींचे नाव गोरखपूर येथील एका दंगलीशी जोडले आहे. कडव्या हिंदुत्वासाठी त्यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली होती. त्यामुळे मोदीनंतर अती कडवे भाजपमध्ये योगी म्हणावे लागतील.
धाडसी निर्णय, एकाधिकारशाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णय धाडसी आणि धक्का देणारे असतात. हीच बाब योगींना लागू होते. मोदींप्रमाणेच योगींचा कारभार एकाधिकारशाहीचा असल्याचे म्हणले जाते. मोदींप्रमाणेच योगींच्या मागेही कौटुंबिक जबाबदारी नाही. मोदींप्रमाणेच योगींचा कार्यपद्धती कठोर असल्याचे मानतात. मोदी चार वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. योगी उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेत. मोदींसारखीच योगींची पक्ष आणि संघटनेवर पकड आहे.
अंधश्रद्धेला मूठमाती
उत्तर प्रदेशमध्ये असे म्हटले जायचे की, जो मुख्यमंत्री नोएडाला जातो तो पुन्हा कधी सत्तेत येत नाही. मात्र, या अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी केले. ते 23 सप्टेंबर 2017 रोजी नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते अनेकदा नोएडाला गेले. विशेष म्हणजे येथील सर्कीट हाऊसमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यापूर्वी 16 वर्षे इतके कोणताही मुख्यमंत्री थांबला नव्हता. या स्थानाला सारे मुख्यमंत्री अशुभ मानायचे. मात्र, योगींनी या अंधश्रद्धेला मूठमाती दिलीच. शिवाय ते पुन्हा सत्तेतही आले.
हस्तिनापूरचे महत्त्व
उत्तर प्रदेशातल्या हस्तिनापूर विधानसभा मतदार संघाची एक मजेशीर गोष्ट आहे. अनेक जण म्हणतात की येथे ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो, तोच पक्ष सत्तेत येतो. इथे आजपर्यंत घडलेही तसेच आहे. या निवडणुकीतही या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. शिवाय तो जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदर काय तर कडवे हिंदुत्व, आक्रमकपणा, एकाधिकारशाही, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, धक्कातंत्र आणि या साऱ्याला विजयाची किनार. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पक्षातील दोन क्रमांकाचा नेता म्हणून पाहिले जाऊ लागले, तर आश्चर्य वाटू देऊ नका.
Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी
Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…