West Bengal Election 2021 Pm Narendra modi kolkata : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी बंगालच्या जनतेची फसवणूक केलीय. पण आता काळजी करु नका. येत्या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी आहे. तेव्हा यावेळी आपण ‘जोर से छाप, TMC साफ’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतादीदींवर जोरदार शरसंधान साधलं. (West Bengal Election 2021 Pm Narendra modi kolkata Ralley mamata banerjee)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या बंगालमधील या पहिल्या प्रचारसभेसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडमधून त्यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
तृणमुल हे काँग्रेसचंच गोत्र आहे तर भाजपच्या मुळात बंगालची महक आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबून कमाल केली. आताही तीच वेळ आली आहे. एका मताची किंमत काय आहे ती आपण काश्मिरपासून अयोध्येपर्यंत पाहिली आहे. यावेळेसही आपण कमळाचं बटन दाबून टीएमसीचा सुपडा साफ करा, असं आवाहन मोदींनी केलं.
दीदीने कधी मला रावण म्हटलं तर कधी मला दानव म्हटलं… मला यानिमित्ताने विचारायचंय दीदी माझ्यावर तुमचा एवढा राग का? बंगालमध्ये आता कमळ फुलणार आहे कारण आपण तसा चिखल केलाय. दीदी मी तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखतोय. आता ही दीदी पहिली दीदी नाही जिने डाव्या संघटनांविरुद्ध मोर्चा काढला होता, असा हल्लाबोल मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बंगालमध्ये आता हटवादी भूमिका संपेल, असं म्हणत बंगालमध्ये परिवर्तन होणारच, असा विश्वास सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर बंगालकडून जे जे हिसकावले गेले, ते ते पुन्हा मिळवून देऊ. तसंच ‘सिटी ऑफ जॉय’ अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालला ‘सिटी ऑफ फ्युचर’ बनवू, असं वचन मोदींनी बंगालच्या जनतेला दिलं.
राहुल गांधी यांच्या ‘हम दो हमारे दो’ तसंच मोदी मित्रांसाठी काम करतात या आरोपांना मोदींनी जोरदार उत्तर दिलं. मोदी म्हणाले, “आज काल आमचे विरोधी पक्ष मी मित्रांसाठी काम करतो, असा आरोप करत आहेत. आपणा सगळ्यांना माहितीय की आपलं जिथं लहानपण गेलं, जिथे आपण वाढलो, खेळलो, जिथे आपण शिकलो, तिथल्या लोकांप्रति आपल्या मनात प्रेमाची सहानुभूतीची भावना असते.
मी गरिबीत वाढलो. मी गरिबीशी संघर्ष केला. त्यामुळे देशभरातील कोणत्याही कोपऱ्यातील गरीब मला जवळचा वाटतो. त्याच्यासाठी काम करावं वाटतं. त्यांचं दु:ख मला माझं दु:ख वाटतं. माझ्या जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठी काम करत राहीन, असं मोदी म्हणाले.
ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. मात्र, भाजपची सत्ता आल्यास बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करुन स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य दिले जाईल. तसेच पश्चिम बंगालमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल. सध्या ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे’ असे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
गेल्या दहा वर्षात पश्चिम बंगालमध्ये असे एकही घर नसेल की तेथील महिला रडली नसेल. याला मोजकेच अपवाद असतील. मात्र, बंगालमध्ये होत असलेल्या अत्याचारांमुळे राज्यातील महिलांवर सातत्याने रडण्याची पाळी येत आहे. मात्र, भाजपची सत्ता आल्यास महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
(West Bengal Election 2021 Pm Narendra modi kolkata Ralley mamata banerjee)
हे ही वाचा :
LIVE | ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या लोकांचा विश्वासघात केला- मोदी