‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सोढीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गुरूचरण सिंग याच्या बेपत्ता होण्याचं गूढ अधिकच वाढलं आहे. कोणीतरी ‘लक्ष’ ठेवेल या भीतीने गुरूचरण सिंग हा 27 वेगवेगळे ईमेल अकाऊंट्स वापरत असल्याचे पोलिसांसमोर उघड झाले आहे. सिंग याच्या केसमधील तपासाशी संबंधित एका पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, कोणीतरी आपल्यावर ‘लक्ष’ ठेवून आहे असा संशय गुरुचरण सिंग याला आला, त्यामुळे त्याने वारंवार त्याची ईमेल अकाऊंट्स बदलली. अभिनेता गुरुचरण सिंग (51 वर्षे) हा 22 एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला जाणार होता, पण तो मुंबईला पोहोचलाच नाही. त्याचे वडील पालम येथे राहतात , त्यांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला मात्र त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही, अखेर त्याच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 26 एप्रिल रोजी पालम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 365 (भारताबाहेर नेण्याच्या किंवा गुप्तपणे बंदिस्त करण्याच्या हेतूने अपहरण) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका पोलिस पथकाला गुरूचरण सिंह याच्या मोबाइल फोनवरून त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम सोपवण्यात आले आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 22 मिनिटांपासून सिंग यांचा मोबाईल बंद आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण-पश्चिम दिल्लीतील डाबरी येथील IGI विमानतळाजवळ होता, तेथे तो ई-रिक्षाने पोहोचला.
गुरूचरण सिंग यांच्याकडे होते २ मोबाईल
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता गुरूचरण सिंग याच्याकडे २ मोबाईल होते, मात्र त्यातील एक फोन त्याने दिल्लीतील घरीच ठेवला. त्याने त्याच्या मित्राला शेवटचा कॉल केला होता, तो त्याला मुंबई एअरपोर्टवर आणायला येणार होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या टीमने गुरूचरण सिंग यांच्या बँक अकाऊंटमधून आणि क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचीही पडताळणी केली,त्याने शेवटचा व्यवहार केला तो सुमारे 14,000 रुपयांचा होता. ज्यादिवशी तो गायब झाला त्याच दिवशी त्याने एवढी रक्कम त्याच्या बँक अकाऊटमधून काढली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूचरण सिंह याची आर्थिक स्थिती बरी नव्हती, त्याच्यावर बऱ्याच रकमेचे कर्जही होते.
पोलिसांच्या अनेक टीम्स तपासात गुंतल्या
गुन्हे शाखा आणि विशेष सेलसह किमान डझनभर पोलिस पथके ही अभिनेता गुरूचरण सिंह यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गुरूचरण सिंग हा एका पंथाचा अनुयायी होता त्यासाठी तो दिल्ली येथील छतरपूरमधील ध्यान केंद्रात जायचा, असेही पोलिसांनी नमूद केले. त्याला ओळखणाऱ्या त्या पंथाच्या अनेक अनुयायांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत. हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड सारख्या काही राज्यात जाऊन, तेथे तपास करून पोलिसांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे.