मुंबई : दक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती आज म्हणजेच 14 डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा चित्रपटसृष्टीतील खूप मोठा प्रवास आहे, त्यानं अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्याला अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आलं. मात्र लोक त्याला भल्लालदेव म्हणूनच जास्त ओळखतात.देशातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजेच बाहुबलीमध्ये भक्कम अशी भूमिका साकारलेला भल्लालदेव आजही सर्वांच्या मनात आहे. प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत असला तरी राणाची भूमिका देखिल महत्वाची होती. राणाशिवाय या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही.
राणा ते भल्लालदेव, कसा होता प्रवास ?
भल्लालदेव बनण्यासाठी राणाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या चित्रपटासाठी त्यानं शारीरिक मेहनत जास्त घेतली. मिळालेल्या माहितीनुसार भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाला रोज 4000 कॅलरीज घेण्याची गरज होती. या मोठ्या इनटेकसाठी तो रोज 40 अंडी खायचा. या व्यतिरिक्त रोज आठ कसरत करुन तो आठ वेळा जेवणही करायचा.
राणानं सांगितलेल्या माहितीनुसार त्यानं या भूमिकेसाठी जवळजवळ 100 किलो वजन वाढवलं होतं. आता इतक्या वजनात कोणाचंही पोट बाहेर येईल, मात्र राणानं शारीरिक व्यायाम मोठ्या प्रमाणात केले, त्यामुळे वाढलेलं वजन देखील केवळ स्नायूंच्या रूपात दिसून आलं आणि अशा प्रकारे भल्लालदेवचं भक्कम शरीर पाहायला मिळालं.
राणाचा चित्रपटसृष्टीलील प्रवास
राणानं बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपट केले. ज्यात त्यानं अभिनेत्री बिपाशा बासुसोबत काम केलं, खिलाडी अभिनेता अक्षय कुमारसोबतसुद्धा राणानं स्क्रिन शेअर केली.दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर त्यानं कमालीचे अॅक्शन सीन दिलेत, यासाठी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं. कोरोना काळात राणा त्यांच्या लग्नामुळे खास चर्चेत होता. कोरोना काळात त्यानं मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो ट्रेंडमध्ये होते.