बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन यंदा खूप गाजला. 6 ऑक्टोबरला झालेल्या ग्रँड फिनालमध्ये सूरज चव्हाणने हा शो जिंकत बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नावं कोरलं. आता हा शो संपून बरेच दिवस उलटून गेले आहेत, तरीही प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल चर्चा सुरू असते. या शोमधले बरेच स्पर्धक गाजले पण शोमध्ये असताना आणि तिथून बाहेर पडतानाही जान्हवी किल्लेकरची भरपूर चर्चा झाली.
बिग बॉसमधून बाहेर आल्यावरही जान्हवी आता सोशल मीडियावर सक्रीय असते, काही दिवसांपूर्वीच तिने शाहरुख-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील ‘जरासा झूम लू में’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला, त्यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रियाही आल्या.
आता जान्हवी बऱ्याच मुलाखतीसुद्धा देताना दसित आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने बिग बॉसमध्ये जाण्याची कशी तयारी केली, किती कपडे नेले होते, कोलॅबरेशन का नाही केल या विषयावर बोलत दिलखुलास गप्पा मारल्या.
40 नाईट ड्रेस आणि कपडे तर…
बिग बॉसमध्ये टास्क क्वीन नावाने प्रसिद्ध असलेल्या जान्हवीचा ड्रेसिंग सेन्सही खूप चांगला आहे. बिग बॉसही त्याचं कौतुक करायचे बऱ्याच वेळा. याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला. कधी, कुठल्या दिवशी घालायचं ते काही ठरवून गेली होतीस का, काय तयारी होती तुझी ?
त्यावर जान्हवीने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही हैराणच व्हाल. ती म्हणाली, ‘ खरं सांगू मी ( बिग बॉसमध्ये जाण्यासाठी) 100 कपडे खरेदी केले होते. कोलॅबरेशन वगैरे काहीच नाही. आता माझ्या घरात बघाल ना तर माझं बेडरून असं कपड्यांनी खचाखच भरलंय नुसतं, जागाच नाही. थोडे दिवसांनी मी आता कपड्यांचा लिलाव करणार आहे, लेके जाओ, लेके जाओ असं करत…’ असं गमतीशीर उत्तर तिने दिलं.
‘ मी खरंच 100 कपडे विकत घेतले, 40 नाईट ड्रेसही होते. कारण काही गोष्टी राहिल्या, आमचे फोटोच नाही असं मला व्हायला नको होतं. मला ना दुसऱ्यांनी डिझाईन केलेलं फार आवडत नाही. माझी चॉईस असते. आपल्याला काय सूट होईल, कसं दिसेल ते आपल्याला माहीत असतं ना. ते कपडे चांगले दिसले पाहिजेत,कम्फर्टेबलही असले पाहिजेत, आपण प्रेझेंटेबलही दिसलो पाहिजे. त्यामुळे ते सगळे कपडे माझेच होते’ असं ती म्हणाली.
ही आयडिया नेमकी कशी सुचली ? त्यावरही जान्हवीने स्पष्ट उत्तर दिलं. ‘ माझा स्वभाव असा आहे ना की मी एखादं काम हातात घेतलं ना तर ते पूर्ण करण्यासाठी मी अक्षरश: झोकून देते. जी मेहनत लागेल ती करायची माझी तयारी असते. मला एकाच वेळेला दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. म्हणजे मी सीरियलमध्ये पण काम करणार आणि दुसरीकडे बिग बॉसमध्ये पण जाणार, असं होत नाही माझं. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मी स्वत:साठी पूर्णपणे 2 महिन्यांचा वेळ घेतला होता. बिग बॉसच्या घरात जाण तेवढं सोप्प नाही, त्यासाठी तुमची मानसिक तयारी पाहिजे तेवढी. तेवढे तयार पाहिजे तुम्ही’ असं ती म्हणाली.
नाहीतर बिग बॉसमध्ये गेलेच नसते..
‘या प्रवासात मला माझ्या घरच्यांचाही खूप पाठिंबा मिळाला. त्यांच्यामुळेच तर मी बिग बॉसमध्ये गेले, नाहीतर मला ते शक्यचं नव्हतं. नाहीतर माझ्या एवढ्या छोट्या मुलाला सोडून जाणं हे आई म्हणून माझ्यासाठी खूप कठीण काम होतं. तिथे घरात ( बिग बॉसमध्ये) असेन मी पण मनात धाकधूक तर असेल ना की तो (मुलगा) बरा असेल ना. पण त्याचे डॅडी त्याची काळजी उत्तम घेतील याचा मला विश्वास होताच, माझ्यापेक्षा जास्त चांगलं ते सांभाळतील याची मला खात्री होती मला, म्हणूनच मी निर्धास्तपणे जाऊ शकले’, असं जान्हवीने नमूद केलं.