सोनी टीव्हवरील प्रसिद्ध क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati -14)ला सद्या चांगलाच चर्चेत आहे. 14 व्या सिझनमधील या ‘शो’ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla)यांनी एक कोटी रुपयांवर आपले नाव कोरले आहे. मात्र, आता शोची ही करोडपती महिला स्पर्धक एक कोटीच्या पुढच्या भागात म्हणजेच 7.5 कोटी रुपयांसाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देते की 1 कोटी रुपये घेऊन शो सोडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत कविता चावला
केबीसीमध्ये एका कोटी जिंकणाऱ्या कोल्हापूरची कविता चावला या गृहिणी आहेत. त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा विवेक याला पहिली ते आठवीपर्यंत शिकवले आहे. आपल्या मुलाला शिकवताना त्यांनी स्वतः कौन बनेगा करोडपतीची तयारी केली. त्यांच्या जिद्दीने आणि आवडीने त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर आणले. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून त्या त्यांचा मुलगा विवेकच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आपल्या मुलाने परदेशात शिक्षण घेऊन देशाचे नाव रोशन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
तिसर्यांदा नशिबाने तिला संधी दिली तेव्हा कविताने ठरवले होते की ती एक कोटी रुपये जिंकल्यावरच या शोमधून जाणार आणि म्हणून हॉटसीटवर बसल्यावर त्यांनी जाहीर केले की त्या एक कोटी रुपये जिंकणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास पाहून अमिताभ बच्चनही थक्क झाले. या शोमध्ये मुलगा विवेक व कुटुंबीयही त्यांच्या सोबत उपस्थित असलेले दिसून आले आहे.