चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पुन्हा एकदा आत्मचरित्रात्मक चित्रपट येणार आहे. या चित्रपटात साऊथ इंड्रस्ट्रीतील मोठा कलाकार मोदी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे काम यावर्षी सुरु होणार आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका तामिळनाडूचे सुपरस्टार अभिनेते सत्यराज साकारणार आहेत. साऊथ इंड्रस्ट्रीचे अभ्यासक रमेश बाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येणाऱ्या बायोपिकची माहीती दिली आहे.
तामिळ अभिनेते सत्यराज यांनी ‘बाहुबली’ चित्रपटात कट्टापा याची गाजलेली भूमिका केली होती. थोर समाज सुधारक पेरियार यांच्या जीवनावरील बायोपिक मध्येही तामिळ अभिनेते सत्यराज यांनी केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. आता सत्यराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका करणार आहेत. हा नवा चित्रपट बॉलिवूडचे निर्माते काढीत असून पॅन इंडियन प्रोजेक्ट अंतर्गत हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषेत हा चित्रपट येणार आहे.
येथे पाहा ट्वीट –
#JUSTIN | மோடியாக நடிக்கிறார் சத்யராஜ்!#NarendraModi | #Sathyaraj | #NarendraModiBiopic pic.twitter.com/M2Xhfupz09
— PuthiyathalaimuraiTV (@PTTVOnlineNews) May 18, 2024
साऊथ इंडस्ट्रीतील रमेश बाला यांनी पीएम मोदी यांच्यावर तयार होणाऱ्या बायोपिक आणि तिच्यातील कास्टची माहीती दिली आहे. हा चित्रपट कोण तयार करीत आहे ? या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता कोण आहेत ? या चित्रपटात कोण-कोण अभिनेते आहेत याची उत्तरे कळालेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रथमच बायोपिक येत नसून याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साल 2019 मध्ये एक बायोपिक आला होता. अभिनेते विवेक ओबेराय याने या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका केली होती. उमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे लेखन अनिरुद्ध चावला यांनी केले होते. यात विवेक ओबेरायचे वडील ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा देखील रोल होता. हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला होता.