मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : आमिर खान हा बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. चित्रपटातील भूमिकेप्रमाणे तो आपली वेशभूषा करत असतो. अशाच एका चित्रपटासाठी त्याने लांब केस वाढविले होते. मिशा वाढविल्या होत्या. तब्बल चार वर्षानंतर त्याचा चित्रपट येणार असल्याने त्याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती. पण दुर्देवाने हा चित्रपट फ्लॉप झाला. त्या सिनेमासाठी दिग्दर्शकाने अभिनेत्री म्हणून बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिला निवडले होते. मात्र, ऐनवेळी आमिर खान याने दिग्दर्शकाला फोन करून ऐश्वर्या रॉय हिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव सुचवले. दिग्दर्शकाने आधी आढेवेढे घेतले अखेर त्यांनी ऐश्वर्या रॉय ऐवजी आमिर खान याने सुचविलेल्या अभिनेत्रीला घेतले. थोडक्यात आमिर खान याने ऐश्वर्या रॉय हिचा पत्ता कट केला होता.
दिग्दर्शक केतन मेहता यांनी 1857 च्या स्वातंत्र लढ्यावर ‘मंगल पांडे: द रायजिंग’ हा चित्रपट केला. 1988 साली त्यांनी या चित्रपटाची तयारी केली होती. त्यावेळी त्यांनी मंगल पांडे भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची निवडही केली होती. परंतु, अमिताभ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याने तो विषय मागे पडला.
1994 मध्ये संजय दत्त याला घेऊन पुन्हा एकदा याच विषयावर आधारित ‘किस्सा कारतूस का’ हा चित्रपट बनणार होता. परंतु, याच काळात संजय दत्त याचे ak 47 प्रकरण घडले आणि ‘किस्सा कारतूस का’ बासनात गुंडाळला गेला. अखेर, 2005 साली केतन मेहता यांनी आमिर खान याला घेऊन चित्रपट पूर्ण केला.
केतन मेहता यांनी आमिर खान याच्यासोबत नायिका म्हणून ऐश्वर्या रॉय हिची निवड केली होती. चित्रपटाचे शुटींग सुरु होणार होते. याच दरम्यान आमिर खान आपल्या घरी टीव्हीवर बीबीसी चॅनल पहात होता. त्यावर ‘क्वेश्चन ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम सुरु होता आणि त्यात अभिनेत्री अमिषा पटेल सहभागी झाली होती.
अभिनेत्री अमिषा पटेल हिने त्या कार्यक्रमात भारतातील काही प्रश्नांन उत्तरे दिली. तिची उत्तरे ऐकून आमिर खान प्रभावित झाला. त्याने दिग्दर्शक केतन मेहता यांना फोन केला. मंगल पांडे मध्ये ऐश्वर्या राय हिच्याऐवजी अमिषा पटेल हिला घ्या असा त्याने आग्रह धरला.
केतन मेहता यांनी आमिर खानला खूप समजावले. ऐश्वर्या हिला का वगळायचे? असे त्यांनी विचारले. त्यावर आमिर खान म्हणाला ‘आमिशा पटेल हिचा आय क्यू ऐश्वर्या पेक्षा खूप चांगला आहे. यासाठी या चित्रपटात ती अभिनेत्री म्हणून हवी. अखेर आमिर याचा आग्रह त्यांना मोडता आला नाही आणि ऐश्वर्या हिचा पत्ता कट होऊन अमिषा पटेल हिची वर्णी ‘मंगल पांडे: द रायजिंग’मध्ये लागली.