मुंबई : ‘युथ’, ‘होऊ दे जरासा उशीर’, ‘दोस्तीगिरी’ यासारख्या चित्रपटातून, तर ‘ती फुलराणी’ या मालिकेतुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘डॅडीं’चा जावई अर्थात अभिनेता अक्षय वाघमारे. त्याने आपल्या चार्म, मेहनत व्यक्तिमत्त्वाने तरुणाईच्या मनात घर केले आहे. लवकरच हा अभिनेता एका नव्या कोऱ्या ‘खुर्ची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे (Actor Akshay Waghmare new movie Khurchi).
या चित्रपटात अक्षय वाघमारे ‘सम्राट’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. खेड्यात राहणारा आणि गावात नावलौकिक असलेला, ऐन उमेदीत अर्थात वयाच्या 25 वर्षी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, मात्र संपूर्ण गावावर स्वतःचे वर्चस्व असणाऱ्या ‘सम्राट’ या मुलाचे पात्र तो या चित्रपटात साकारत आहे. अक्षयची ही आगळीवेगळी आणि दमदार भूमिका नक्कीच साऱ्या प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.
या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल विचारले असता अक्षय म्हणाला, ‘राजकारण हा विषय माझ्याही आवडीचा आहे. त्यामुळे चित्रपटात भूमिका साकारताना मी स्वतः त्या भूमिकेशी एकरूप झालोय. एका वेगळ्या धाटणीची अशी ही भूमिका मी पहिल्यांदाच साकारतोय. त्यामुळे मी ही स्वतःला या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला आवर्जून उत्सुक आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातही राजकारण हा विषय अगदी माझ्या जवळचा आहे. त्यामुळे त्याचा माझ्यावर राजकारणाचा झालेला प्रभाव या चित्रपटातुन कुठेतरी दिसेल, असे मला वाटते. गावाकडील राजकारणाचे डावपेच एकंदरीत या चित्रपटात प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत. राजकारण हा विषय हातळतानाचा मी तुम्हाला नक्कीच आवडेन याची मला खात्री आहे’.
अक्षयने मे महिन्यात ‘डॅडी’ अर्थात अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी हिच्याशी लग्नगाठ बांधली असून, लवकरच तो ‘बाबा’ बनणार आहे. या आगामी चित्रपटात अक्षयसह अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अभिनेत्री श्रेया पसलकर हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही या चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.
दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टीम’ दिग्दर्शित हा चित्रपट ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत, संतोष वसंत हगवणे निर्मित असून सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर, आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांनी चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून आपली भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. हा सिनेमा खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शवणारा आहे. गावागावात खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून मांडण्यात येणार आहेत. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
(Actor Akshay Waghmare new movie Khurchi)