हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी अल्लू अर्जुन याला काल ( शुक्रवारी) दुपारी अटक करण्यात आली होती. रात्रभर तुरूंगात काढल्यावर आज सकाळी त्याची सुटका झाली आणि तो अंतरिम जामिनावर बाहेर पडलाय. शनिवारी सकाळी 6.40 च्या सुमारास तो चंचलगुडा जेलबाहेर आला. त्याला रिसीव्ह करण्यासाठी त्याचे वडील आणि फिल्म प्रोड्युसर अल्लू अरविंद यांच्यासह त्याचे सासरेही पोहोचले. तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारीच अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनाची कागदपत्रे रात्री उशिरा कारागृह अधिकाऱ्यांकडे पोहोचली. त्यामुळे त्याला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली. कारागृहाच्या नियमानुसार कैद्यांना रात्री सोडता येत नाही.
जेलमधून बाहेर पडल्यानंतर अल्लू अर्जुन हा ज्युबिली हिल्स येथील त्याच्या निवासस्थानी पोहोचला. त्यानंतर तो पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला आणि या संपूर्ण प्रकरणावर त्याने प्रथमच मौन सोडले.
काय म्हणाला पुष्पा स्टार ?
‘ मला जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या सर्व चाहत्यांचेही मनापासून आभार मानतो, पण काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी सुरक्षित आहे, ठीक आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. मी कायद्याचा आदर करतो. (याप्रकरणाच्या) तपासात मी पूर्णपणे सहकार्य करेन. जी घटना घडली ती खूप दुर्दैवी होती, त्याबद्दल मला खेद आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ‘ अशा शब्दांत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun released from jail.
He was taken to Chanchalguda Central Jail yesterday after a Court sent him to a 14-day remand. Later, he was granted interim bail by Telangana High Court on a personal bond of Rs 50,000. pic.twitter.com/Xqu3KpBAt6
— ANI (@ANI) December 14, 2024
‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदारबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी शुक्रवारी हैजराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुडा तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली.