अल्पावधीच्या काळातच रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका झपाट्याने घराघरांत पोहोचली. अरुंधतीचं आयुष्य, तिचा संसार, कष्ट, टक्के -टोणपे या सर्वच गोष्टींशी प्रेक्षक समरस झाले. आई, अप्पा, अनघा, यश यांनाही प्रेक्षकांनी आपलंसं केलं. त्यांच्या दु:खात रडले, आनंदात सामील झाले. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या, गेल्या चार वर्षांहून अधिक काळ छोटा पडदा गाजवणारी ही मालिका आता निरोप घेत आहे. या मालिकेत अनिरुद्ध हे प्रमुख पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनीच एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण मालिकेच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सर्व सहाय्यक कलाकारांचे मिलिंद गवळी यांनी आभारही मानले आहेत.
चार वर्षांहून अधिक काळ गाजवणाऱ्या या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले, मात्र काही वर्षांनी मालिकेत तोचतोच पणा, रटाळपणा येऊ लागला. मालिकेतील काही बदल, ट्विस्ट प्रेक्षकांना झेपले नाहीत, तर काही रुचले नाहीत. त्यामुळे या मालिकेची वेळही बदलून दुपारची करण्यात आली होती. काही प्रेक्षकांनी तर ही मालिका आता कधी बंद होणार असे प्रश्नही विचारण्यास सुरूवात केली होती. आता ही मालिका खरंच बंद होणार असून मिलिंद गवळी यांच्या पोस्टने त्याला दुजोराच मिळाला आहे.
काय आहे मिलिंद गवळी यांची पोस्ट
मी मिलिंद गवळी , स्टार प्रवाह परिवार आणि Director’s Kut Prodn, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आमची “आई कुठे काय करते” ही स्टारप्रवाह वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2024 हा या मालिकेचा प्रवास होता, या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊनस, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंग ला सुरुवात , आणि लॉकडाऊन च्या काळात स्टारप्रवाहने “आई कुठे काय करते” चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली, ती इतकी भावली की अक्षर: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं. आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते “होऊ दे धिंगाणा” किंवा पुरस्कार सोहळ्यां मध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.
DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही 45 ते 50 वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम,पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं, त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले, आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही.
नमिता वर्तक यां ची कथा पटकथा खूप भारी होती, या सिरीयलचे संवाद छान असायचे, प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार, या सिरीयल मध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश,इशा,अनघा,विमल, शेखर विशाखा आरोही गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी हा सर्वांचा आभारी आहे.
चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
मिलिंद गवळी यांनी ही पोस्ट केल्यावर शेकडो चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही आवडती मालिका संपत असल्याने अनेक प्रेक्षक भावूक झाले. ‘ ही मालिका मला खूप आवडते. तुम्हाला सर्व कलाकारांना खूप miss करू…. जमलं तर पुन्हा दुसऱ्या मालिका सारख्या ही मालिकाही repet नवीन वेळेवर पाहायला आवडेल आम्हाला…’, ‘ही मालिका खूप छान आहे उगीच बंद करू नका ‘ , ‘आम्ही पण खूप मिस करणार ही serial… गेली चार साडे चार वर्ष आम्ही न चुकता बघतोय ही serial.’ अशा अनेक प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी या मालिकेचे कौतुक केलं आहे, काहींनी ही मालिक बंद करू नका असे आवाहनही केलं.